Directors of Kolhapur’s Gokul Milk Union reportedly take a stress-relief trip to Goa Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Milk : सततच्या राजकारणाने 'गोकुळ'च्या संचालकांना 'मानसिक थकवा'; रिफ्रेशमेंटसाठी गेले गोव्याला!

Gokul Milk : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या संचालकांचे मानसिक स्वास्थ बिघडले आहे. त्यामुळे रिफ्रेशमेंट मिळावी यासाठी संचालक गोव्याला गेले आहेत.

Rahul Gadkar

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघ म्हणजे जिल्ह्याचे अर्थकारण आणि राजकारण. या दूध संघाला शेतकऱ्यांची कामधेनून म्हणूनही ओळखले जाते. अर्थात यासाठी शेतकऱ्यांचे आणि दूध उत्पादकांचे कष्ट अत्यंत महत्त्वाचे आहे. दूध उत्पादक दिवसभर गोठ्यात राबतो, घाणीची परवा न करता काबाडकष्ट करतो आणि दूध गोकुळमध्ये घालतो, यावरच हे अर्थकारणाचे चक्र सुरु राहते. मात्र याच काबाडकष्टाच्या जोरावर आणि गोकुळ दूध संघातील संचालकांचही राजकारण आणि अर्थकारण सुरू आहे.

मे महिन्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संचालक मंडळाचे आणि सरकारचे राजकारण बघायला मिळाले होते. आता मागच्या काही दिवसांत 3 देशांतर्गत आणि 1 विदेश दौरा करून आल्यानंतर गोकुळचे संचालक पुन्हा नव्या दौऱ्यावर गेले आहेत. गोकुळमधील काही संचालकांचे मानसिक स्वास्थ बिघडले आहे. त्यामुळे रिफ्रेशमेंट मिळावी यासाठी संचालक गोव्याला गेले आहेत. आधी हे प्रशिक्षण केरळमध्ये व्हावे अशी अनेकांची इच्छा होती. मात्र सर्वांनुमते गोवा हे स्थळ निश्चित करण्यात आले.

गोकुळमध्ये जे विरोधक होते तेच आता सोबत सत्तेत आहेत. त्यामुळे सक्षम विरोधकच नाही आणि विचारायलाही कोणी नाही. त्यामुळे संचालकांची गाडी थेट गोव्यात जाऊन पोहोचली आहे. गोव्यात तीन दिवस मानसिक शारीरिक आणि भावनिक आरोग्य सुधारण्यासाठी हॅप्पीनेस हब प्रशिक्षण होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा दौऱ्यांमुळे आता दूध उत्पादकांकडून चौफेर उलट सुलट चर्चा होताना दिसत आहे. वारंवार होणाऱ्या या दौऱ्यांवर हरकत घ्यायची कोणी? असा प्रश्न निर्माण होत आहे.

यापूर्वी गतवर्षी जुलै महिन्यात संचालक केरळ दौऱ्यावर गेले होते. यात तत्कालीन अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे सुपुत्र अभिषेक डोंगळे यांचा समावेश झाल्यामुळे हा दौरा गाजला होता. त्यानंतर संचालक दिल्ली, बिहार हे देशांतर्गत दौरे करून आले. तीन महिन्यांपूर्वी सिंगापूर, इंडोनेशिया आणि थायलंड या विदेश दौऱ्यावरही गेले होते. आता पुन्हा गोवा दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर संचालक आणखी कुठे, कुठे दौरे करणार याची उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

"आम्ही सकाळी उठल्यानंतर वैरण आणून, शेण काढून दूध काढेपर्यंत दिवस संपून जातो. वेळ गेलेला समजत नाही. त्यामुळे आठवडी बाजारला देखील आम्हाला जायला मिळत नाही. पण या दूध उत्पादकांच्या जीवावर संचालक महिन्याला दौरे करत आहेत. त्यांना कोणीतरी विचारणारं हवं, अशा शब्दात दूध उत्पादक दीपक काटकर यांनी 'सरकारनामाशी' बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT