Gokul Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul: गोकुळमधील संस्थांच्या चौकशीचं 'ग्रहण' संपेना; आणखी 800 दूध संस्था रडारवर

Gokul Election, Gokul Voter List, Kolhapur Politics: गोकुळ दूध संघाच्या मतदार यादीवरील तक्रारी, संस्थांच्या पात्रता चौकशा आणि अपीलांमुळे निवडणुकीपूर्वी कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले असून शेकडो संस्था अडचणीत आहेत.

Rahul Gadkar

Gokul Voter List: गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक संस्थांच्या चौकशीचं सत्र अद्यापही सुरूच असून, त्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण चांगलंच तापलं आहे. एकमेकांच्या संस्था अपात्र ठराव्यात, यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. महायुतीतील काही नेत्यांसह महाविकास आघाडीतील नेतेही या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दररोज नव्या आदेशांमुळे संस्थांची संख्या चौकशीच्या कक्षेत येत असल्याने आणखी सुमारे 800 दूध संस्था रडारवर आल्याची माहिती समोर आली आहे.

त्रिसदस्यीय चौकशी समितीने यापूर्वीच 2021 नंतर नोंदणी झालेल्या दूध संस्थांची माहिती मागवली होती. ठराव आणि निवडणूक प्रक्रियेतील विलंबामुळे ही प्रक्रिया रखडली होती. दरम्यान, सहाय्यक दुग्धनिबंधक कृष्णा ठाकरे यांनी मागील आठवड्यात अशा संस्थांची सविस्तर माहिती गोकुळ प्रशासनाकडून मागवली आहे. गोकुळकडे सध्या एकूण 1,872 संस्था असून, त्यापैकी जवळपास 800 संस्थांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीत नेमक्या किती संस्था कायम राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वीच चौकशी समितीने अर्हता दिनांकानंतर नोंद झालेल्या 427 संस्थांपैकी 410 संस्थांना बाजूला करण्याचा निर्णय घेतला होता. या संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याचे आदेश पुणे विभागीय उपनिबंधकांनी दिले आहेत. या आदेशावर अंतिम निर्णय प्रशासकांनी घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

गोकुळ प्रशासनाने सुरुवातीला 5,427 दूध संस्था मतदानासाठी पात्र असल्याचे पत्र दुग्धनिबंधक कार्यालयाकडे पाठवले होते. मात्र त्यावर मोठ्या प्रमाणात हरकती आणि तक्रारी दाखल झाल्या. सध्या 1,320 संस्था विविध चौकशी आणि प्रशासकीय प्रक्रियेत अडकल्या असून, त्यापैकी 644 संस्थांवर व्यवसायाशी संबंधित आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.

याशिवाय, तत्कालीन प्रशासक सुजय कदम यांनी पात्र ठरवलेल्या 2,267 संस्थांविरोधात विभागीय सहनिबंधकांकडे तक्रारी दाखल असून त्यांचीही चौकशी सुरू आहे. पावसाळ्यात नोंद झालेल्या 129 संस्थांची अपिले प्रलंबित असून त्याचा निकाल आज सायंकाळपर्यंत अपेक्षित आहे. तसेच आणखी 228 संस्थांनी विभागीय उपनिबंधक, पुणे यांच्याकडे अपील दाखल केले असून, त्यावरही निर्णय होणे बाकी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT