Kolhapur News, 16 May : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळच्या घडामोडीवर बोलताना, महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हाताशी धरून माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये राजकारण केलं अशी टीका केली.
आता भाजपने देखील थेट हसन मुश्रीफ यांच्यावरच लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडी म्हणून पाटील यांनी गोकुळमध्ये सत्ता स्थापन केली. त्याप्रमाणे आता महायुती म्हणून हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या बाजूने रहावे अशा पद्धतीची विनंती भाजपकडून करण्यात आली.
त्याबाबतचे परिपत्रक भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी काढत थेट मुश्रीफ यांनाच परिपत्रकाच्या माध्यमातून आवाहन केलं आहे. जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी काढलेल्या परिपत्रकात, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यांची ही कृती योग्यच आहे.
गोकुळमध्ये महायुतीचाच अध्यक्ष असावा, अशी त्यांची भूमिकाही बरोबर आहे. आता महायुतीचे घटक असणाऱ्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीचा धर्म पाळावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले आहे.
पत्रकात म्हटलं आहे की, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा न देण्याची भूमिका घेतली. ते गेली दोन-अडीच वर्षे महायुतीचे नेते म्हणून काम करत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा जोमाने प्रचार केला.
विधानसभेच्या निवडणुकीत प्रकाश आबिटकर, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांचा प्रचार केला. या तिन्ही मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार निवडून आले. सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येसुद्धा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्र पक्षांची महायुती अस्तित्वात राहिली पाहिजे, अशी भूमिका डोंगळे यांनी घेतली. गोकुळ दूध संघात महायुतीचाच अध्यक्ष असावा, ही डोंगळे यांची भूमिका योग्य आहे.
जिल्ह्यात महायुतीचे नेते म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ नेतृत्व करतात. सहकारी संस्थांच्या कामकाजातसुद्धा मुश्रीफ यांची भूमिका ही महायुतीला पूरकच असली पाहिजे. त्यामुळे मुश्रीफ यांनी महायुतीशी प्रतारणा न करता डोंगळे यांच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा. गोकुळ दूध संघात महायुतीचा अध्यक्ष राहील आणि त्याचे नेतृत्व हसन मुश्रीफच करतील, यासाठी प्रयत्न करावेत. असे परिपत्रकात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.