Gokul Election_Amit Shah 
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election 2026: गोकुळच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच अमित शहा झालेत टार्गेट! सोशल मीडियावरुन का होतेय टीका?

Gokul Election 2026: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. यामध्ये सतेज पाटील यांच्या पॅनलनं आघाडी घेतली आहे.

Amit Ujagare

Gokul Election 2026: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. यामध्ये संध्याकाळी २५ पैकी १४ जागांवर सतेज पाटील यांच्या पॅनलनं तर महायुतीच्या पॅनलनं ११ जागांवर आघाडी घेतली होती. त्यामुळं सतेज पाटलांच्या पॅनलचा विजय निश्चित मानला जात असताना त्यांच्या समर्थकांकडून जल्लोषाला सुरुवात झाली. अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त व्हायला सुरुवात केली. त्यातच काही पोस्ट या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टार्गेट करणाऱ्या होत्या, गोकुळच्या निवडणुकीत महायुतीच्या पराभवानंतर शहा यांच्यावर टीका केली जात आहे.

महायुतीचा पराभवाची चर्चा का?

गोकुळची निवडणूक ही २५ जागांसाठी झाली, त्यासाठी सत्ता काबीज करण्यासाठी १३ मतांचा बहुमताचा आकडा आहे. पण मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीनं बहुमताचा आकडा पार करुन १४ जागांवर तगडी आघाडी घेतली होती. तर महायुतीला ११ जागांवर आघाडी होती. पण इथं महायुतीच्या पराभवाची चर्चा व्हायला लागली कारण महायुतीतील सध्या राज्यात सत्तेत असलेले तीन मोठे पक्ष, जिल्ह्यातील महायुतीचे १० आमदार, दोन खासदार अशा सर्वांची ताकद या निवडणुकीत पणाला लागली होती. इतके तगडे लोकप्रतिनिधी सोबत असल्यानं गोकुळची निवडणूक एकतर्फी महायुतीच्या बाजूनं होईल असा विश्वास महायुतीला होता.

पण काही महिन्यांपासून या निवडणुकीचे वेध लागलेले असताना जागा वाटपाबाबत शेवटपर्यंत महायुतीत एकमत होत नव्हतं, अनेक कुरघोड्या सातत्यानं सुरु होत्या. महायुती अंतर्गतच एकमेकांना आव्हानं दिली जात होती. त्यामुळं या नकारात्मक बाबींचा फटका महायुतीला बसला असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळं महायुतीच्या इतक्या मोठ्या नेटवर्कसमोर एकट्या सतेज पाटलांनी आपली ताकद पणाला लावत जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळं याची दिवसभर जोरदार चर्चा रंगली होती.

अमित शहा झाले टार्गेट

दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीत अमित शहा यांचा काय संबंध? असा प्रश्न अनेकांना पडला असेल, कारण सोशल मीडियावर त्यांना टार्गेट केलं गेलं आणि टीकाही व्हायला लागली आहे. पण तसा थेट गोकुळच्या निवडणुकीत अमित शहा यांचाही काही संबंध नव्हता. पण अमित शहा हे कोल्हापूरचे जावई आहेत हे सर्वश्रृत आहेच, त्यामुळं त्यांचं कोल्हापुरातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरही आपल्याच पक्षाचं किंबहुना महायुतीचं वर्चस्व राहावं असा शहा याचा मानस असणार असा तर्क लढवला जात आहे. हा अंदाज बांधण्यासाठी कारणंही तसंच घडलं होतं, अमित शहा हे काही महिन्यांपूर्वी तीन महिन्यांच्या अंतरानं दोन वेळा कोल्हापुरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचा पहिला दौरा हा २० जून रोजी इचलकरंजीत झाला होता, त्यानंतर दुसरा दौरा १९-२० सप्टेंबर अनुक्रमे, एकसंबा (चिक्कोडी, बेळगाव) आणि हुपरी इथं दौरा होता. पण त्याचदरम्यान गोकुळच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणं सुरु असतानाच शहांचा दौरा असल्यानं त्यांच्या दौऱ्याबाबत चर्चा सुरु होती.

याच काळात गोकुळसाठी महायुतीतील राष्ट्रवादी, भाजप नेत्यांमध्ये जागा वाटपावरुन आरोप, प्रत्यारोप सुरु होते. त्यातच शहा यांचा कोल्हापुरात मुक्काम असल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. पण तरीही यावर तोडगा निघू शकला नव्हता. त्यानंतर महायुतीचे नेते गोकुळच्या निवडणुकीसंदर्भात थेट दिल्लीला अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचा सभा होऊन अखेर जागा वाटप पूर्ण झालं होतं. यामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला ९, भाजपच्या ७, शिवसेनेच्या ७ आणि जनसुराज्यच्या वाटाल्या २ जागा आल्या होत्या.

जानकरांच्या विधानानं खळबळ

या सर्व घडामोडींमुळं गोकुळवर सत्ता कायम राखण्यासाठी अमित शहांचा अप्रत्यक्षपणे का होईना पण सहभाग दिसत असल्यानं ते आता टार्गेटवर आले आहेत. त्यातच प्रचारादरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी खळबळजनक विधान केलं होतं की, "महायुतीच्या सरकारमध्ये दुग्धविकास मंत्री असताना सरकारनं गोकुळच्या खासगीकरणाचा आणि मल्टिस्टेट करण्याचा घाट घातला होता. त्यासाठी आपल्याला २०० कोटी रुपायांची ऑफरही दिली होती" त्यामुळं यंदा जर महायुतीची गोकूळवर पुन्हा सत्ता आली तर त्याचं गुजरातमधील 'अमूल दूध' संघाप्रमाणं मल्टिस्टेटमध्ये रुपांतर होईल अशी अप्रत्यक्षपणे भीती त्यांनी व्यक्त केली होती. या एका बाबीचा अमित शहांवर टीका करण्यासाठी अनेक युजर्सनं आधार घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT