

Drought Maharashtra: यंदा राज्यात दुष्काळाचं किती भीषण सावट आहे याची अधिक गांभीर्यानं कल्पना येईल अशी घटना नांदेडमध्ये घडली आहे. दुष्काळामुळं पावसानं दडी मारली अन् हाताशी आलेलं पीक वाळून गेल्यानं एका शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं. डोक्यावर कर्ज अन् मुलांशा शाळांची फीची चिंता सतावत असल्यानं या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यंदाच्या दुष्काळातला हा पहिला बळी ठरला आहे.
नांदेड जिल्ह्यातील बोरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी शंकर क्षीरसागर यांनी आपल्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी आपल्या या परिस्थितीचं कारण आणि सरकारचा अनागोंदी कारभार यावर भाष्य केलं आहे.
व्हिडिओमध्ये क्षीरसागर म्हणतात, "हॅलो कलेक्टर साहेब मी विनंती करतो की, शासनानं जाहीर केलेल्या माझ्या तीन कर्जमाफी झाल्या तरीही माझं कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीत कधीही नाव आलेलं नाही, यानिमित्त मी आत्महत्या करतो आहे. मुलींसाठी शैक्षणिक फी माफ असल्याचं शासन म्हणतं पण ती कुठे माफ आहे सांगा बरं? मी तुमच्यासारखाच आहे. माझी कलेक्टर साहेबांनी गांभीर्यानं चौकशी करावी" अशा शब्दांत या शेतकऱ्यानं आपली परिस्थिती शासन दरबारी मांडली आणि आपलं जीवन संपवलं.
दरम्यान, हा शेतकरी अल्पभूधारक होता, पावसानं दडी मारल्यानं त्यांच्या शेतात हाताशी आलेलं पिक करपून गेलं. त्यामुळं आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर असताना पिक निघाल्यानंतर त्यातून कर्जाची पूर्तता आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतील अशी त्यांना आशा होती. पण तत्पूर्वीच दुष्काळामुळं सगळं होत्याचं नव्हतं झालं. त्यातच मुलीच्या शिक्षणासाठीची फी पण भरायची होती. शासनानं मुलींसाठी फी माफी आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केलेली असली तरी या दोन्ही लाभांपासून हे शेतकरी वंचित राहिले, त्यांना शासनाकडून कुठलीही मदत मिळू शकली नाही, अशी माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.
त्यामुळं यंदाच्या दुष्काळाचं भीषण रुप आता समोर यायला लागलं आहे. पुढच्या काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही अधिक भीषण होणार आहे. त्यामुळं याबाबत राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून कशा प्रकारे राज्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्त व्यक्तीला मदत दिली जाते याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.