Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ' च्या निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या विविध दूध संस्थांकडून ठराव सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून अंतिम मतदानाची तारीख सप्टेंबर महिन्यामध्ये असण्याचा अंदाज आहे. मात्र आतापासूनच महायुतीमध्ये जागावाटपावरून छुपे दावे सांगितले जात आहेत. 25 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत चारही घटक पक्षांत इच्छुकांची मांदियाळी आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ दूध संघाला अनन्यसाधारण महत्व आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या नेत्यांना आगामी निवडणूक महायुती म्हणून लढवण्यासाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊन देखील गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये तणाव वाढला आहे.
महायुती म्हणून मोट बांधली जात असतानाच आमदारांकडून मात्र डावलले जात असल्याने उघड उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. महायुतीच्या नेत्यांकडून विरोधकांना आव्हान देण्यापेक्षा मानपानावरून विरोधकांच्याच सोबत जाण्याचा इशारा दिला जात असल्याने निवडणुकीच्या घोषणेपर्यंत महायुतीतील नेते एकत्र राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील प्रमुख महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीला भाजपचे सहयोगी आमदार शिवाजीराव पाटील यांना निमंत्रण न दिल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त करत विरोधकांसोबत जाण्याची भाषा केली.
मागील काही महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीत शह- कटशहाचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे जरी नेते एकत्र राहिले तरीही माजी संचालक, संस्था सभासद, कार्यकर्ते प्रामाणिक राहतील का? याची शंकाच आहे. शिवाय घटक पक्षातील इच्छुकांची मांदियाळी पाहता 'गोकुळ'चे जागावाटप हा कळीचा ठरणारा मुद्दा कसा सुटणार? यावरच निवडणुकीतील महायुतीचे यश अवलंबून राहणार आहे.
महायुतीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि जनसुराज्य शक्ती या घटक पक्षांचा समावेश आहे. 25 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत चारही घटक पक्षांत इच्छुकांची मांदियाळी आहे. त्यामुळे पॅनेलची रचना ही सर्वच पक्षांना मोठी डोकेदुखी ठरणार आहे. पॅनेलमध्ये उमेदवारी न मिळणाऱ्या इच्छुकांची नाराजी कोणत्या थराला जाणार यावरच संपूर्ण पॅनेलचे यश अवलंबून राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. भाजपकडे सध्या तरी इच्छुकांची संख्या तुलनेने कमी असली, तरी मोठा भाऊ असणाऱ्या भाजपला 'गोकुळ' मध्येही मोठा भाऊ बनायचे आहे. साहजिकच महायुतीच्या पॅनेलमध्ये उमेदवारी म्हणजे संचालकपद फिक्स ही धारणा असल्याने भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे महायुतीची जागा वाटपामध्येच खरी कसोटी असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.