कोल्हापूरची अर्थवाहिनी असलेल्या 'गोकुळ' दूध संघाच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. विभागीय दुग्ध निबंधकांनी गोकुळमधील तब्बल ४२७ दूध संस्थांवर अपात्रतेची कुऱ्हाड चालवल्यानंतर आता हे राजकारण थेट न्यायालयाच्या उंबरठ्यात पोहोचले आहे.
आमदार सतेज पाटील यांनी या अनपेक्षित कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी, ८ जून रोजी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार असून, होऊ घातलेली गोकुळची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच गोकुळ दूध संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. 1 जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. गोकुळकडे सध्या ५,४२७ सभासद संस्थांची नोंदणी आहे. मात्र, निवडणूक जाहीर होताच प्रशासकीय पातळीवरून सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही मोठा धक्का देण्यात आला. प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे विभागीय दुग्ध निबंधकांनी अचानक ४२७ दूध संस्था थेट मतदान यादीतून अपात्र ठरवल्या.
संबंधित संस्थांचे वेळेत लेखापरीक्षण (Audit) झालेले नाही.
या संस्थांचे दूध संकलन बंद आहे किंवा अत्यंत कमी आहे.
दूध संस्थांची कोणतीही कायदेशीर निवडणूक झालेली नाही.
या कारवाईमुळे या ४२७ संस्थांचा मतदानाचा अधिकार हिरावला गेला असून, राजकीय गणिते पूर्णपणे बिघडली आहेत.
४२७ संस्थांवर कोणतीही पूर्वकल्पना किंवा सुनावणीची पुरेशी संधी न देता घाईघाईने ही अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. हा राजकीय सुडबुद्धीने घेतलेला निर्णय असल्याचा सूर विरोधी गोटातून निघत आहे. यामुळेच सतेज पाटील यांनी थेट कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करून या हुकूमशाही कारभाराला आव्हान दिले आहे. सोमवारी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देणार की निवडणूक प्रक्रियेला ब्रेक लावणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, ज्या १३२० दूध संस्था आधीच अवसायनात काढण्यात आल्या आहेत, त्यांचा या ४२७ संस्थांमध्ये समावेश नाही. म्हणजेच, आधीच १३२० संस्थांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना, त्यात आणखी ४२७ संस्थांची भर पडल्याने गोकुळचे राजकारण प्रचंड तापले आहे. आगामी काळात या १३२० संस्थांचीही सुनावणी होणार असून, त्यातीलही अनेक संस्था अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.