Hasan Mushrif And Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil : 'माझ्यामुळे बंटी राज्यमंत्री, आता...'; सतेज पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर मुश्रीफांनी सुनावले खडेबोल

Hasan Mushrif Targets Satej Patil After Gokul Chairman Election : 'गोकुळ' दूध संघाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात जोरदार टीका-टिप्पणी सुरू झाली आहे.

Aslam Shanedivan

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मंगळवारी (ता. १०) पार पडलेल्या निवडणुकीत राजेश पाटील यांना १६ मते मिळाली, तर समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांना १३ मतांवर समाधान मानावे लागले.

दरम्यान, विजयानंतर महायुतीने गोकुळच्या बाहेर जल्लोष केला. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'मी सतेज पाटलांचा हात धरून मंत्री झालो नाही, तर सतेज पाटीलच माझा हात धरून मंत्री झाले,' असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षानंतर कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा मुश्रीफ विरुद्ध सतेज पाटील असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

'कोणाचा हात धरून जायला माझा हात एवढा बारका हाय व्हय?'

गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रचारादरम्यान सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. मुश्रीफ हे आपला हात धरून गोकुळमध्ये आल्याचे विधान त्यांनी केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना मुश्रीफ यांनी, 'कोणाचा हात धरून जायला माझा हात एवढा बारका हाय व्हय?' असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर सतेज पाटील यांनीही मुश्रीफ यांच्यावर पलटवार करत गंभीर आरोप केले होते.

या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर गोकुळमध्ये सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला. बहुमताचे राजकीय गणित असूनही सतेज पाटील यांच्या गटाला अध्यक्षपद मिळवता आले नाही. शासननियुक्त संचालकांच्या माध्यमातून महायुतीचा अध्यक्ष निवडून आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

'तुमचा अध्यक्ष करा, असे मी अनेकदा सांगितले होते'

गोकुळच्या अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड झाल्यानंतर महायुतीने विजयी सभा घेतली. या सभेत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, कालच्या मनोगतात सतेज पाटील यांनी पाच हजार मतांच्या या निवडणुकीतून संपूर्ण राज्याचे परिवर्तन करण्याची भाषा केली होती. त्यांना बहुमत मिळाले होते आणि मी अनेकदा त्यांना तुमचा अध्यक्ष करा, असे सांगितले होते.

विनयराव कोरे यांनी उल्लेख केल्याप्रमाणे, कोरमसाठी आवश्यक असलेला आकडा आम्ही ठरवलेला नव्हता. तो गोकुळच्या उपविधीमध्येच नमूद आहे. तीन वेळा कोरम पूर्ण झाला नसता, तर गोकुळवर सरकारला प्रशासक नेमावा लागला असता. तुमचा अध्यक्ष करण्याचा आदेश जनतेने आम्हाला दिलेला नव्हता, तर विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश आम्हाला मिळाला होता, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

'गोकुळवर कब्जा करण्यासाठी अध्यादेश आणलेला नाही'

गोकुळमधील वैधानिक पेच सोडवण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश आणल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन या अध्यादेशामागील भूमिका स्पष्ट केली होती. गोकुळवर कब्जा करण्यासाठी नव्हे, तर संघाचे व्यवस्थापन २५ जणांच्या हातात राहावे आणि निर्माण झालेला वैधानिक पेच सुटावा, यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

दोन्ही पक्षांनी एकत्र बसून तोडगा काढल्यास अध्यादेश मागे घेण्याची तयारी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पानभर जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. काँग्रेसच्या नेत्यांनी मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचे काम केले, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला.

'...तर सतेज पाटील मंत्री झाले नसते'

सतेज पाटील यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत मुश्रीफ यांनी त्यांच्यावर आणखी एक बोचरी टीका केली. ते म्हणाले की, सतेज पाटील पहिल्यांदा गृह राज्यमंत्री झाले, त्यावेळी 'बंटी आणि बबली' ही जोडी प्रसिद्ध झाली होती. मात्र, त्यावेळी मी आणि विनय कोरे यांनी सहभाग घेतला नसता, तर त्यांना राज्यमंत्री होण्याची संधी मिळाली नसती. दुसऱ्यांदा विधान परिषदेत जाण्याच्या वेळीही विरोधातील नेते महादेवराव महाडिक यांना विनंती करण्यात आली होती. विनय कोरे आणि चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य घेऊन त्यांची दुसरी विधान परिषद बिनविरोध करण्यात आली. त्यानंतरच ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले, असा दावा मुश्रीफ यांनी केला.

'मग सांगा, कोण कोणाचा हात धरून आत आलं?'

पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले, 'मग आता सांगा, कोण कोणाचा हात धरून आत आलं? माझा आणि विनय कोरे यांचा हात धरून ते विधान परिषदेत गेले आणि आता तेच आमच्यावर भाष्य करत आहेत. याबद्दल मला अतिशय खेद वाटतो.' शेवटी सतेज पाटील यांना इशारा देताना मुश्रीफ यांनी, 'जाता जाता त्यांना इतकाच इशारा देतो की, ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाबळी,' असे म्हणत राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत दिले. गोकुळच्या अध्यक्षपदावर महायुतीने मिळवलेल्या विजयामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवी समीकरणे तयार झाली आहेत. आता हसन मुश्रीफ यांच्या टीकेला सतेज पाटील काय प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT