

Kolhapur News : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून, अध्यक्षपदावर महायुतीचा उमेदवार विराजमान झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील हे गोकुळचे नवे अध्यक्ष झाले आहेत. तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांच्या पदरी दुसऱ्यांदा निराशा पडली आहे. दरम्यान, गोकुळमधील या नाट्यमय घडामोडींनंतर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चार संचालकांच्या नियुक्तीवरून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या माध्यमातून त्यांनी महायुतीचा पडद्यामागील डाव उघड केल्याचा दावा केला आहे.
गोकुळ दूध संघावर राज्य सरकारने डॉ. प्रवीण हेंद्रे, शिवाजी आडनाईक, कृष्णात पाटील आणि प्रशांत पाटोळे यांची तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, याआधी महायुतीकडून शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफ, ए. वाय. पाटील आणि अशोक फराकटे यांच्या नावांची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, राज्य शासनाने अखेर वरील चार नावांची अधिकृत घोषणा केली. नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत या चारही संचालकांनी महायुतीच्या बाजूने मतदान केल्याचे समोर आले आहे. यामुळे आता नवा राजकीय मुद्दा उपस्थित झाला असून, सतेज पाटील यांनी स्वीकृत संचालकांच्या कार्यकाळासह महायुतीच्या पडद्यामागील रणनीतीवर बोट ठेवले आहे.
तीन महिन्यांसाठीच संचालकांची नियुक्ती? सतेज पाटलांचा मोठा दावा
सतेज पाटील यांनी यावेळी काही स्वीकृत संचालकांचे सहा महिन्यांचा अनुभव असल्याचे दाखले तयार करण्यात आल्याचे सांगितले. त्यांना अनुभव असल्याचे सांगण्यात आले. मात्र, जेव्हा या चार जणांच्या नियुक्तीची वेळ आली, तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट भूमिका मांडली. जिल्ह्यातील नेत्यांनी नव्हे, तर स्वतः मुख्यमंत्र्यांनीच पडलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही स्वीकृत संचालक करणार नसल्याचे स्पष्ट केले होते, असा दावा आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले होते की, पडलेल्या उमेदवारांना मागच्या दाराने स्वीकृत संचालक म्हणून संधी दिल्यास जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे चार वेगळी नावे द्या, अशी भूमिका त्यांनी घेतली होती, असे सतेज पाटील यांनी सांगितले. मात्र, चार वेगळी नावे देताना संबंधित मंडळींनी एक अट घातली. कोल्हापुरात यापूर्वी तीन महिन्यांचा महापौर असा इतिहास घडला होता. त्याच धर्तीवर या चार स्वीकृत संचालकांचाही कार्यकाळ केवळ तीन महिन्यांचा ठेवण्याची रणनीती आखण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला.
तीन महिन्यांनंतर या स्वीकृत संचालकांनी राजीनामा द्यायचा आणि त्यानंतर पूर्वी ज्या नावांची चर्चा सुरू होती, त्यांनाच पुन्हा स्वीकृत संचालक म्हणून संधी द्यायची, अशी योजना असल्याचे त्यांनी सांगितले. चेअरमन निवडीपुरता लोकांमध्ये असा संदेश जावा की, आम्ही नवीन माणसांना संधी दिली असून, पूर्वीच्या नावांना बाजूला ठेवले आहे, असा या रणनीतीमागील हेतू असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे या चार संचालकांची नियुक्ती केवळ तीन महिन्यांसाठीच करण्यात आली असल्याची अंतर्गत माहिती सूत्रांकडून मिळाल्याचेही सतेज पाटील यांनी सांगितले. या दाव्यामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीवरून नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
गोकुळच्या चार संचालकांचे राजकीय कनेक्शन काय?
दरम्यान, या चारही संचालकांचे राजकीय कनेक्शनही चर्चेत आले आहे. शिवाजी आडनाईक हे पन्हाळा तालुक्यातील असून, जिल्हा बँकेतून विभागीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी निकटचे संबंध असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांचे नाव मुश्रीफ यांनी सुचविल्याची चर्चा आहे. डॉ. प्रवीण हेंद्रे हे स्त्रीरोगतज्ज्ञ असून, ते पेठवडगावचे रहिवासी आहेत. हेंद्रे हे महाडिक कुटुंबीयांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांचे नाव महाडिक यांनी पुढे केले असावे, अशी चर्चा आहे.
कृष्णात पाटील हे चार्टर्ड अकाउंटंट असून, ते कागल तालुक्यातील रहिवासी आहेत. सहकार क्षेत्रात त्यांची चांगली पकड आहे. त्यांचे नाव शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सुचविल्याचे सांगितले जात आहे. तर संघर्ष मोर्चात सतेज पाटील यांनी सर्वाधिक आक्षेप घेतलेले अॅड. प्रशांत पाटोळे हे जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचे निकटवर्ती मानले जातात. ते विविध संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून परिचित आहेत.
एकीकडे गोकुळच्या अध्यक्षपदावर महायुतीने वर्चस्व मिळवले असताना, दुसरीकडे चार स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सतेज पाटील यांच्या दाव्यांमुळे गोकुळमधील आगामी राजकीय घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.