

Gokul Chairman Election News: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे उमेदवार राजेश पाटील अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेवरून टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना सतेज पाटील यांनी, ‘२०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून कोणाला मुख्यमंत्री व्हायचे होते?’ असा सवाल उपस्थित केला. या सवालातून त्यांनी चंद्रकांत पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याची चर्चा सुरू झाली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना एकदा तरी मुख्यमंत्री व्हायचे असल्याची टीका केली होती. त्यावर उत्तर देताना सतेज पाटील म्हणाले, “ते मुख्यमंत्री व्हायचं म्हणतायत, हे ऐकून चांगलं वाटलं. मात्र, मला मुख्यमंत्री होण्याची कोणतीही आकांक्षा किंवा इच्छा नाही. मी गेली ३० वर्षे राजकारणात आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न असतो. मी यावर बोललो तर फार पुढे जाईल. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून कोणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं?” असा पलटवार त्यांनी केला.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना सतेज पाटील यांनी शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयावरही आक्षेप घेतला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कोरम पूर्ण होत नसल्याचा मुद्दा पहिल्याच दिवशी न्यायालयात मांडल्याचे त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश पाटील कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष राहणार असल्याचेही ते म्हणाले. शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणे हा लोकशाहीचा, महाराष्ट्राचा आणि कोल्हापूरचा अपमान असल्याची टीकाही त्यांनी केली.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवशी सोमवारी झालेल्या संघर्ष मोर्चावर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना लक्ष्य केले. “महायुती म्हणून आम्ही सगळे पक्ष एकत्र आहोत. मात्र, महाविकास आघाडीत फक्त बंटी पाटील होते, शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कुठेच दिसला नाही. जिथे जाईल तिथे सगळ्यांना पायाखाली घ्यायचे आणि आपलीच टिमकी वाजवायची. कारण मला कधीतरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचे आहे. मुख्यमंत्री व्हायला तेवढी समज लागते,” अशी टीका त्यांनी केली होती.
समाजमाध्यमांना हाताशी धरून बातम्या चालवल्या जात असल्याचा चंद्रकांत पाटील यांचा आरोपही सतेज पाटील यांनी फेटाळून लावला. पत्रकारांना आपण कधी बातम्यांची स्क्रिप्ट दिली किंवा कोणत्या बातम्या कशा चालवाव्यात, यासाठी दबाव टाकला का, असा सवाल त्यांनी पत्रकारांनाच केला. गोकुळच्या निवडणुकीदरम्यान माध्यमांनी केलेले वार्तांकन आणि व्यंगचित्रांमधून मांडलेले स्थानिक प्रश्न राज्यपातळीवर पोहोचले, असेही त्यांनी सांगितले. आता त्याच माध्यमांच्या भूमिकेवर विरोधक प्रश्न उपस्थित करत असल्याचे ते म्हणाले.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ता किंवा जातीय समीकरणांचा वापर करून पद मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपही त्यांनी फेटाळले. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीवरून सुरू झालेला सतेज पाटील विरुद्ध चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वाद आता नव्या मुद्द्यांवरून पुढे सरकताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.