Gokul election News: ‘गोकुळ’ची निवडणूक जाहीर झाल्यापासून ते उमेदवार ठरवून प्रत्यक्ष मतदानापर्यंत महायुतीच्या प्रमुख नेत्यांत असलेला बेबनाव निकालानंतर चव्हाट्यावर आला. एकमेकांचा काटा काढण्याच्या प्रयत्नात संघावरील महायुतीची सत्ताच संपुष्टात आली. प्रचार मेळाव्यात नेत्यांची एकी जरूर दिसली; पण प्रत्यक्ष मतदानात एकमेकांवरील ‘सूड’ उगवला गेल्याचे तालुकानिहाय पडलेल्या मतांवरून स्पष्ट झाले.
पाच वर्षांपूर्वी महाडिक यांच्या विरोधात लढलेले आणि सत्तांतर केलेले आमदार सतेज पाटील यांच्या व्यतिरिक्त सर्व जण महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र होते. त्यात भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेना व जनसुराज्य शक्ती पक्षाचा समावेश होता. सुरुवातीलाच ठराव किती आणि जागा किती, यावरून महायुतीत दावे-प्रतिदावे सुरू झाले.
त्यात काही नव्याने नोंदलेल्या संस्था अपात्र ठरवण्याचा प्रयत्न झाला. त्यात ‘अदृश्य शक्ती’च्या नावाखाली महायुतीतीलच एक कार्यरत असल्याचे पुढे आले. या शक्तीचे थेट नाव घेण्याचे धाडस कोणी केले नाही; पण ही शक्ती होती हे मात्र सर्वांनी मान्य केले. या वादात संस्था सुरुवातीला अपात्र, पुन्हा पात्र आणि न्यायालयाने त्या सर्वांना मतांचा अधिकार दिल्याने हा वाद संपला.
गोकुळच्या संस्था पात्र-अपात्रतेचा वाद संपताच जागा वाटपावरून महायुतीत जुंपली. ज्यांचे ठराव जास्त त्या पक्षाला जास्त जागा हे सूत्र ठरले; पण ठरावांचे संख्याबळ ठरवण्यासाठी भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच वाद पेटला. हा वाद अर्वाच्य शिवीगाळ देऊन अंगावर धावून जाण्यापर्यंत गेला. त्यात शौमिका महाडिक आक्रमक झाल्या.
मंत्री पाटील यांनी कसाबसा हा वाद शांत केला, तोपर्यंत मंत्री हसन मुश्रीफ तिथे आले. वादामुळे संतापलेल्या मंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांनाच खडेबोल सुनावले. या वादानंतर प्रत्यक्ष जागा वाटपाची वेळ आली त्यावेळी स्थानिक पातळीवर मतभेद तयार झाले. त्यामुळे शेवटी जागा वाटपाचा वाद थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेला.
नेत्यांच्या बैठकीत फडणवीस यांनी सर्वांचे ऐकून घेऊन कळवतो, असे सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी राष्ट्रवादीला नऊ, तर भाजप, सेनेला प्रत्येकी सात जागा व ‘जनसुराज्य’ला दोन जागा देण्याचे फडणवीस यांनी कळवले; पण अधिकच्या जागेसाठी राष्ट्रवादीचे नेते मंत्री मुश्रीफ यांनी हे सुरुवातीला मान्य केले नाही; पण नंतर त्यांना नमते घ्यावे लागले.
या सर्व घडामोडींमुळे महायुतीत एक प्रकारे अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रचारात सर्व एकत्र; पण प्रत्यक्ष घडामोडीत कुणाचा ‘काटा’ काढायचा याचेच ‘परफेक्ट’ नियोजन झाले आणि त्याचा परिपाक प्रत्यक्ष निकालात दिसला.
महायुतीतील नेत्यांचा बेबनावच आमदार सतेज पाटील यांच्या फायद्याचा ठरला. त्यामुळे ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान होईल, अशी खात्री असलेल्या तालुक्यातही महायुतीचा भ्रमनिरास झाला आणि मतदारांनी मतपत्रिकेत हुडकून अनेकांचा पत्ता कापला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.