Kolhapur News, 20 Oct : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार, खासदारांना अंगावर घेऊन आमदार सतेज पाटील यांनी संयमाने या निवडणुकीचे नियोजन केले. याउलट महायुतीत मतदारांना विश्वासात घेण्यापेक्षा नेत्यांच्या उथळ पाण्याला खळखळाट अधिक दिसला. आमदार पाटील यांनी ‘अंडर करंट’ हेरून महायुतीला टप्प्यात घेऊन पद्धतशीर ‘करेक्ट कार्यक्रम’ केला.
पहिल्यापासून आमदार पाटील यांनी संयमी भूमिका घेतली. अदृश्य शक्तीला विरोध करताना महायुती म्हणून सर्व नेते एकत्रित दिसले नाहीत. किंबहुना अदृश्य राहून काहींनी मंत्री हसन मुश्रीफ यांना चक्रव्यूहात अडकवले. महायुती होणार की नाही इथंपासून ठरावधारकांपर्यंत पोहोचण्यावर मर्यादा आल्या.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत न्यायालयीन लढाई झाली. यावेळी सुमारे १४०० संस्थांना त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी लढावे लागले. यानंतर याच संस्थांनी ‘सत्यविजय’ मेळावा घेऊन मंत्री मुश्रीफ यांना महायुतीत भाजप सोबत जाऊ नये, असा इशारा दिला होता. मात्र या सर्व संस्था आपल्याच आहेत, आपल्या शब्दावर चालणार असल्याचा अविर्भाव दिसला.
इकडे आमदार पाटील मात्र प्रत्येक मतदाराला भेटण्यासाठी गेले. विरोधातील नेत्यांच्याही घरी ते पोहोचले. याची सहानुभूतीही त्यांच्या पथ्यावर पडली. संयमाने त्यांनी पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात शिवसेना ठाकरे गटातील माजी आमदार सत्यजित पाटील यांना आपल्याकडे घेतले. त्याचाही फायदा त्यांना निवडणुकीत झाला.
महायुतीतील मतभेद, मनभेद दूर झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात हे दूध उत्पादकांना मान्य नव्हते. महायुतीने पातळी सोडून जाहीर शपथा घेणे, सहलीला नेण्याचे प्रकार केले. हे मतदारांना मनापासून आवडले नाही. त्याचाही संयमाने आमदार पाटील यांनी प्रचारात उपयोग केला.
गोकुळच्या हालचाली मुंबईतून घडत असल्याचा मुद्दा आमदार पाटील यांनी घेऊन प्रचारात ‘गोकुळ’ मुंबईत नेल्याचा प्रचार केला. त्याचाही फायदा झाला. मी कार्यकर्त्यांसाठी लढतोय, माझ्या घरातील कोणीही उमेदवार नाही असे सांगून घराणेशाहीवरही त्यांनी बोट ठेवले. विरोधकांचे उट्टे काढण्याची भाषा न करता संयमाने प्रचार केला.
भविष्यातील राजकारणाला इशारा
प्रचारात मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, मंत्री चंद्रकात पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरे यांच्या भविष्यातील राजकारणाला आणि जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीला हा एक इशाराच दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.