Kolhapur Gokul Election News : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या राजकारणात अधिकाऱ्यांचा फुटबॉल झाला आहे. सातत्याने येणाऱ्या तक्रारी, आरोप-प्रत्यारोपातून येणाऱ्या दबावामुळे गोकुळ दूध संघाच्या प्रशासक पदावरच नको, अशी भावना अधिकाऱ्यांची होत आहे. शिवाय या नेत्याच्या मर्जीतील अधिकारी किंवा त्या मर्जीतील नेत्यांचा अधिकारी नको, अशा अंतर्गत गटबाजीमुळेही अधिकाऱ्यांची हेळसांड होत आहे. यातूनच आता गोकुळच्या प्रशासक पदावरील अध्यक्ष तिसऱ्यांदा बदलला आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ 'गोकुळ'च्या प्राधिकृत अधिकारी मंडळाच्या अध्यक्षपदी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग प्रदीप महावीर मालगावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७७ अ (१) अन्वये विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), पुणे विभाग यांनी यासंदर्भातील सुधारित आदेश जारी केला. या मंडळात सुनील रामचंद्र धायगुडे, सागर बलवकडे आणि डॉ. चंद्रकांत परुळेकर हे सदस्य म्हणून कामकाज पाहणार आहेत.
नियुक्तीनंतर मालगावे यांनी गोकुळ ही राज्यातील अग्रगण्य सहकारी दूध संस्था असून दूध उत्पादकांचा विश्वास जपणे ही सर्वोच्च जबाबदारी असल्याचे सांगितले. शासनाने सोपविलेली जबाबदारी मंडळातील सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पारदर्शक व प्रभावीपणे पार पाडू. दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत गोकुळची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजय कुमार सुद्रिक अखेर कार्यमुक्त
गोकुळ प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दूध संस्थांचे प्रतिनिधी तसेच अन्य काही जणांनी प्रशासकांकडे गोकुळच्या मागील कारभाराची माहिती मिळण्यासाठी अर्ज केले होते. ही माहिती मिळण्यासाठी त्यांच्याकडून वारंवार प्रशासकांना धारेवर धरण्याचा आणि जाब विचारण्याचा प्रकार घडला.
यामुळे प्रशासक संजय कुमार सुद्रिक यांनी गोकुळच्या प्रशासक पदाच्या जबाबदारीतून कार्यमुक्त करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती. मध्यंतरी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे काही काळ ते रजेवर होते. प्रकृती ठीक झाल्यानंतर त्यांनी सातारा येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात रुजू झाले. मात्र, गोकुळ प्रशासक पदाची जबाबदारी नको, या भूमिकेवर ते ठाम राहिले. त्यामुळे त्यांना कार्यमुक्त करत प्रदीप मालगावे यांची गोकुळ प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.