Gokul Election: कोल्हापूरमधील 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी आता तालुकास्तरावर पोहोचली आहे. चंदगड तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष निवडणुकीत एकत्र लढणार अशी घोषणा डॉ. नंदिनी बाभुळकर यांनी केली आहे. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर आणि त्यांचे बंधू रामराजे कुपेकर वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. महायुतीमध्ये जागा वाटपात उमेदवारीवरून अडचण निर्माण होईल असा अंदाज आल्यानंतर दोघेही कुपेकर बंधू आमदार सतेज पाटील यांची सोबत देण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही.
चंदगड तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादीने नगरपालिका, नगरपंचायत व जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्र लढवली. या निवडणुकीत त्याचा फायदा दोन्ही पक्षांना झाला. त्यामुळे आगामी गोकुळ दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका एकत्र लढण्यासंदर्भात डॉ. नंदिनी बाभुळकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत गोकुळ दूध संघाची निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या बैठकीला जिल्हा परिषदेचे सदस्य संग्रामसिंह कुपेकर हे लंडन दौऱ्यावर असल्याने उपस्थित राहू शकले नाही. तर रामराजे कुपेकर यांना जनरल मीटिंग असल्याचं सांगण्यात आले होते. त्यामुळे हे देखील या बैठकीला उपस्थित नव्हते.
तत्पूर्वी मागील काही दिवसांपुर्वी रामराजे कुपेकर आणि संग्रामसिंह कुपेकर यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन गोकुळ निवडणुकी संदर्भात चर्चा केली होती. त्यामुळे दोन्ही कुपेकर बंधू हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहणार की आमदार सतेज पाटील यांच्यासोबत जाणार? याकडे लक्ष लागले आहे. या दरम्यान डॉ. नंदिनी बाभुळकर यांनी आपण दोघांनाही निमंत्रण दिले होते. ही बैठक जनरल कार्यकर्त्यांची होती. त्यामुळे आम्ही यापुढे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं सांगितले. जर कोणी वेगळा विचार करत असेल तर आपण त्यांच्याशी चर्चा करू असेही डॉ. बाभुळकर म्हणाल्या.
दुसऱ्या बाजूला या निवडणुकीत सन्मानजनक जागा मिळत असेल तरच निर्णय घेणार असल्याचे 'सरकारनामाशी' बोलताना कुपेकर यांनी स्पष्ट केले होते. तत्पूर्वी डॉ. नंदिनी बाभुळकर यांच्या बैठकीत या दोन बंधुची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान रामराजे कुपेकर यांनी, आपल्याला ही जनरल कार्यकर्त्यांची बैठक आहे असं सांगण्यात आलं होतं. जर ताईंनी गोकुळ संदर्भात बैठक होणार आहे असे स्पष्ट केले असते तर मी या बैठकीला उपस्थित असतो. असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान महायुतीमध्ये जागावाटप करताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढायच्या झाल्यास, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाट्याला किती जागा येणार याचे उत्तर अद्याप नाही. शिवाय चंदगड, भुदरगड, राधानगरी, करवीर, आणि कागल तालुक्यांमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. प्रत्येक तालुक्यात किमान दोन जागा घ्यायच्या झाल्यास मंत्री मुश्रीफ यांना दहा जागा मिळणे अपेक्षित आहे.
मात्र महायुतीतील जागा वाटपावरून स्पर्धा पाहता मंत्री हसन मुश्रीफ यांना अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुपेकर बंधू हे सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीतून उमेदवारी मिळते का? याची चाचपणी करत आहेत. त्याला आमदार सतेज पाटील देखील सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे सांगितले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.