आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने दाखल करण्यात आलेल्या ठरावांमध्ये गोकुळ मधील नेत्यांनाच धक्का लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांच्या नावाने एकापेक्षा अधिक ठराव आल्याने या ठरावांना कात्री लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके यांच्या नावाने डबल ठराव दाखल झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाने सर्वाधिक सहा ठराव दाखल झाले आहेत.
गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठराव दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता या ठरावाच्या नियमावलीकडे सर्वच नेत्यांची लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे ठराव कोणाचे बाद होणार? याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे. कोऱ्या ठरावाबरोबरच आता एकाच नावाने अधिक ठराव दाखल झाले आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दाखल झालेल्या ठरावांची यादी पाहिली तर जिल्ह्याच्या मातब्बर नेत्यांच्या नावाने एकापेक्षा अधिक ठराव दाखल झाले आहेत.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल तालुक्यातून जवळपास सहा ठराव मंत्री मुश्रीफ यांच्या नावाने दाखल झाले आहेत. तर माजी अध्यक्ष नवीद मुश्रीफ, तिलतअमरीन मुश्रीफ, अबीद मुश्रीफ यांच्यानावाने प्रत्येकी दोन, तर भाजपचे नेते समरजीत घाटगे यांच्या नावाने तीन, नवदीता घाटगे यांच्या नावाने दोन तर वीरेंद्र मंडलिक यांच्या नावाने देखील दोन ठराव दाखल झाले आहेत.
काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या नावाने गगनबावडा व करवीर तालुक्यातून प्रत्येकी एक असे दोन ठराव दाखल झाले आहेत. तर पूजा ऋतुराज पाटील व माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे देखील करवीर आणि हातकणंगले तालुक्यातून प्रत्येकी दोन ठराव दाखल झालेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नावाने करवीर तालुक्यातून तीन ठराव दाखल झालेत. तर त्यांच्या पत्नी तेजस्विनी पाटील यांच्या नावे चार ठराव दाखल झालेत. आमदार चंद्रदीप नरके यांच्या नावाने पन्हाळा तालुक्यातून तीन, तर राजवीर नरके यांच्या नावाने करवीर आणि गगनबावडा तालुक्यातून प्रत्येकी एक एक ठराव दाखल झाला आहे.
यासह आणखी डोंगळे, यड्रावकर यांच्या घरातून ठराव दाखल झाले आहेत. या नेत्यांच्याच नावाने सर्वाधिक एकापेक्षा अधिक ठराव असल्याने त्यांच्या ठरावावर कोण आक्षेप घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. यापूर्वी नातेवाईकांच्या नावावर ठराव देणाऱ्या वर कारवाई केली जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. अर्ज छाननी प्रक्रियेत कोणत्याही एका ठरावाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याने उर्वरित ठराव रद्द ठरू शकतात. त्यामुळे या निवडणुकीत नेत्यांना देखील फटका बसणार आहे.
दरम्यान, एका व्यक्तीच्या नावावर ठिकठिकाणी संस्था आणि ठराव असू शकतात. मात्र त्या संस्थामधील सभासदांनी आक्षेप घेतल्यानंतर ठराव रद्द होऊ शकतो. मात्र हा आक्षेप कोण घेणार? याकडे लक्ष आहे. त्यामध्ये सिद्ध झाले तर कारवाई होऊ शकते. अन्यथा नेत्यांना अनेक मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.