गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव नवीद मुश्रीफ गटाकडून मांडण्यात आला आहे.
मात्र महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विनय कोरे यांच्या निर्णयावर निवडणुकीचे भविष्य ठरणार असून सतेज पाटील यांचा प्रभाव निर्णायक ठरू शकतो.
kolhapur gokul election politics : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक ही बिनविरोध करावी, अशी मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्यासह काही संचालकांनी आमदार विनय कोरे यांच्याकडे प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी करणार असल्याची नेत्यांनी घोषणा केली आहे.
पण निवडणुकीत होणारा पैशाचा वापर आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव आमदार विनय कोरे यांनी स्वीकाराला तरी पुन्हा एकदा आमदार कोरे हे महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांना एकत्र आणणार का? तो कोणत्या मुद्द्यावर आणणार हा कळीचा मुद्दा आहे. तर दुसरीकडे ही निवडणूक झाल्यास सतेज पाटील यांची धास्ती महायुतीबरोबरच संचालक उमेदवारांना आहे. कारण गोकुळच्या निवडणुकीसाठी आर्थिक बाजू भक्काम असेल त्याचाच विजयाचा मार्ग सुकर आहे.
गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळातील काहींनी आमदार कोरे यांच्या पुढे ठेवला. मात्र आमदार कोरे हे सध्या महायुतीचे घटक आहेत. महापालिकेच्या राजकारणानंतर जिल्हा परिषदेच्या राजकारणात महाडिक आणि कोरे यांची गट्टी चांगलीच जमली आहे. मागील दहा वर्षाचा राजकारणाचा विचार केल्यास आमदार कोरे यांनी मागे झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची साथ दिली होती. तर महाडिक गटाच्या विरोधात ते निवडणुकीच्या रिंगणात होते.
दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार अमल महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यात निवडणूक होत असताना आमदार कोरे यांच्या मध्यस्थीने ही निवडणूक बिनविरोध झाली. आमदार अमल महाडिक यांनी माघार घेतली त्यामुळे सतेज पाटील हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले.
या मध्यस्थीमध्ये राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सतेज पाटील यांनी लढवू नये, या अटीवर महाडिक यांनी माघार घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र आमदार सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या विरोधात राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत पॅनेल उभा केले. विधानपरिषद निवडणुकीत जी काही चर्चा झाली. त्याचा दाखला नंतर स्वतः विनय कोंरे यांनी वडगावच्या सभेत दिला होता.
मागील पाच वर्ष सोडले तर त्यापूर्वी 25 वर्ष गोकुळ दूध संघावर महाडिक गटाची सत्ता होती. गोकुळ दूध संघावरील आमदार सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्ता काढून घेतल्यानंतर आज ही महाडिक गटांमध्ये या दोघांच्या बद्दल मनात सल आहे. मंत्री हसन मुश्रीफ हे महायुतीचे नेते असले तरी महापालिका जिल्हा परिषद आणि जिल्ह्याच्या इतर राजकारणात भाजपने हसन मुश्रीफ यांच्याबद्दल घेतलेल्या भूमिकेतून हा असंतोष दिसून येतो.
शिवाय मंत्री मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्यातील दोस्ती हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे सहाजिकच महाडिक गट आमदार सतेज पाटील यांच्या गटासोबत गोकुळच्या निवडणुकीत जुळवून घेईल का? जर घेतला तर तो कोणत्या मुद्द्यांवर घेतले जाईल? हा कळीचा मुद्दा आहे. शिवाय आमदार कोरे यांनी पुन्हा महाडिक आणि पाटील गटाला एकत्र करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे राजकीय पटलावर परिणाम होऊ शकतात.
दुसरीकडे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही संचालकांनी आमदार कोरे यांची भेट घेतली आहे. निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील काही नेत्यांनी सभासदांना लाख मोलाचे टोकन दिले आहे. ही निवडणूक लागल्यास जवळपास 200 ते 250 कोटीचा चुरडा या निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही बाजूचा विचार केलास तर पैशाचा अमाप वापर होण्याची शक्यता आहे. तो इतर संचालकांना न परवडणारा आहे.
मागील निवडणुकीचा संपूर्ण अंदाज घेऊन सतेज पाटील या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. पाच वर्षे सत्ता असल्याने बऱ्यापैकी गोकुळमधील सभासदांची नाळ सतेज पाटील यांनी ओळखले आहे. जर निवडणूक लागल्यास महायुतीच्या संचालकांना आर्थिक गोष्टीचा वापर केल्याशिवाय निवडणूक जिंकता येणार नाही याचा अंदाज आला आहे. त्यामुळे सतेज पाटील यांची धास्ती महायुतीतील संचालक उमेदवारांनी आतापासूनच घेतलेली दिसते.
1. गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार का?
सध्या बिनविरोध करण्याचा प्रस्ताव आहे, मात्र अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
2. या निवडणुकीत कोणते गट आमनेसामने आहेत?
महालायुक्ती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.
3. विनय कोरे यांची भूमिका काय आहे?
त्यांच्या निर्णयावर निवडणूक बिनविरोध होणार की लढत होणार हे ठरणार आहे.
4. सतेज पाटील यांचा प्रभाव किती आहे?
त्यांची मजबूत आर्थिक आणि राजकीय ताकद निवडणुकीत निर्णायक ठरू शकते.
5. निवडणुकीत पैशांचा किती प्रभाव असतो?
सहकारी निवडणुकांमध्ये आर्थिक बाजू मजबूत असणे विजयासाठी महत्त्वाचे मानले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.