

कोल्हापूर दूध संघातील 1200 सभासदांच्या पात्रतेची पडताळणी सोमवारपासून सुरू होणार आहे.
पडताळणीनंतरच कोण पात्र किंवा अपात्र ठरणार याचा निर्णय होणार आहे.
या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये तणाव आणि उत्सुकता वाढली आहे.
kolhapur Gokul politics : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील बाराशे सभासदांच्या पात्रतेबाबत काउंटडाऊन सुरू झाले आहे. येत्या सोमवारपासून दुग्ध निबंधक प्रशासनाकडून या बाराशे सभासदांच्या पडताळणीला सुरुवात होणार आहे. पडताळणीनंतरच या सभासदांबाबत निर्णय होणार आहे. तर या सभासदांमधील कोणते सभासद पात्र होतील किंवा अपात्र होतील याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
या सभासदांपैकी सर्वाधिक सभासद हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाचे असल्याची माहिती आहे. शिवाय यामध्ये काही जुन्या संस्था देखील असल्याने माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि नरके यांच्या देखील जुन्या संस्था असण्याची शक्यता आहे. यामुळे आमदार सतेज पाटलांसह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचे देखील टेन्शन वाढले आहे.
दरम्यान, आवसायानात काढलेल्या सभासदांबाबतचा आदेश रद्द करावा यासाठी गोकुळच्या संस्थातील सभासदांनी दुग्ध निबंधक कार्याल्यासमोर गर्दी केली होती. तत्पूर्वी न्यायालयाकडून बाराशे सभासदांबाबत अपात्रेचा चेंडू हा दुग्ध निबंधक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने या संस्था वगळून निवडणूक होणार का याबाबत अनेकांना शासकंता आहे.
येत्या सोमवारपासून अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू केलेल्या सुमारे १२०० दूध संस्थांना नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. अवसायनात काढण्यापूर्वी त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांनी दिली.
‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी ठराव गोळा करण्यासाठी संस्थांची यादी तयार करण्याचे काम दुग्ध विभागाकडून सुरू झाले होते. दरम्यानच्या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल झाली. यावर सुनावणी होऊन अखेर न्यायमूर्तींनी स्थगिती रद्द केली. त्यामुळे आता सहाय्यक दुग्ध निबंधकांना पुढील प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यानुसार सुमारे १२०० संस्थांना टप्प्याटप्प्याने नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. त्यानुसार त्यांची सुनावणी होणार आहे. तालुकानिहाय सुनावणी घेतली जाणार आहे.
संबधित दूध संस्थांना सुनावणीची तारीख व वेळ कळविली जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक संस्थेची स्वतंत्र सुनवाणी होईल. या सुनावणीत संस्थेचे दैनंदिन दूध संकलन किती आहे, लेखापरीक्षण झाले आहे का, संचालक मंडळाची मुदत संपलेल्या संस्थांची निवडणूक झाली आहे का, यांची तपासणी होणार आहे.
यासंदर्भातील सर्व कागदपत्रे संस्थांना सादर करावी लागणार आहेत. तसेच सर्व निकषांत न बसणाऱ्या दूध संस्था अवसायनात काढल्या जाणार आहेत. सध्या केवळ सुनावणी होणार असून, एकत्रित निर्णय शेवटची सुनावणी झाल्यावर दिला जाणार असल्याचेही मालगावे यांनी सांगितले.
1. सभासद पडताळणी कधी सुरू होणार आहे?
सोमवारपासून दुग्ध निबंधक प्रशासनाकडून पडताळणी सुरू होणार आहे.
2. किती सभासदांची पडताळणी होणार आहे?
सुमारे 1200 सभासदांची पात्रता तपासली जाणार आहे.
3. या पडताळणीचा उद्देश काय आहे?
सभासदांची पात्रता निश्चित करून योग्य सदस्यांची निवड करणे हा उद्देश आहे.
4. या प्रक्रियेमुळे कोण प्रभावित होणार आहे?
दूध संघातील सदस्यांसह जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते प्रभावित होणार आहेत.
5. निकाल कधी जाहीर होणार आहे?
पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच निकाल जाहीर केला जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.