Gokul sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul: गोकुळमध्ये महाडिक-मुश्रीफ भांडणात अधिकाऱ्यांचे अतोनात हाल; स्वतःला 'बादशाह' समजणाऱ्या कार्यकर्त्यांचा मुजोरपणा

Gokul Milk Union, Kolhapur Politics, Mahayuti Dispute: गोकुळ दूध संघातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, तक्रारी आणि राजकीय हस्तक्षेपामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा समोर आला असून प्रशासक मंडळात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Gokul Election: कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघातील महायुतीतील अंतर्गत वाद वरवरून मिटला असल्याचं दाखवलं जात असलं तरी अधिकाऱ्यांच्या आडून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. सहाय्यक दुग्ध निबंधक प्रदीप मालगावे यांची एका रात्री तडकाफडकी बदली करत सावंतवाडीचे सहाय्यक दुग्ध निबंधक सुजय कदम यांना या पदावर आणण्यात आले होते. मात्र कदम यांचीही बदली काही राजकीय घडामोडीने घडल्यानंतर चंदगडचे कृष्णा ठाकरे यांची या ठिकाणी बदली करण्यात आली. कदम हे मंत्री मुश्रीफ यांच्या संपर्कातील आहेत. तर मालगावे हे महाडिक यांच्या संपर्कातील आहेत. असा समज गोकुळच्या राजकारणात असल्याने संस्था प्रतिनिधींच्या माध्यमातून या दोघांनाही सातत्याने त्रास दिला जात होता. प्रशासक मंडळात मालगावे असल्याने पुन्हा एकदा संस्था प्रतिनिधीच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. त्यामुळे प्रशासक मंडळात अस्वस्थता आहे.

संस्था पात्र-अपात्रतेचा निर्णय होण्यापूर्वीच काही दूध संस्था प्रतिनिधींच्या शिष्टमंडळांकडून वैयक्तिक टीकाटिप्पणी होत असल्याने गोकुळचे प्रशासक मंडळ अस्वस्थ आहे. विशेषतः प्रशासक मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे यांना यात जास्त 'लक्ष्य' करण्यात येत आहे. विद्यमान संचालकांची मुदत ४ मे रोजी संपली, तत्पूर्वी ३ मे रोजी विभागीय सहनिबंधक राजकुमार पाटील यांनी गोकुळवर प्रशासक मंडळाची नियुक्ती केली.

संदीपकुमार सुद्रीक यांच्या अध्यक्षतेखालील या मंडळात प्रदीप मालगावे, सुनील धायगुडे, सागर बलकवडे, चंद्रकांत परूळेकर यांचा समावेश आहे. सदस्य मालगावे यापूर्वी सहायक निबंधक (दुग्ध) या पदावर कार्यरत होते. संघाच्या निवडणुकीच्या तोंडावरच प्रकाश बेलावडे व आमदार शिवाजी पाटील यांनी त्यांच्यावरच आरोप केले. त्यातून त्यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी सुजय कदम यांची नियुक्ती झाली, पण त्यांच्यावरही आरोप झाले आणि त्यांनाही लगेच हटवले.

संघाचे दैनंदिन काम करत असतानाच संघाच्या बदनामीवरून रोज एका शिष्टमंडळाला तोंड द्यावे लागते. आज एका गटाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गटाकडून हाच प्रकार होतो. दोन्ही गट सत्ताधारी असल्याने कोणाला काही बोलण्याची सोय राहिलेली नाही. काही चुकीचे उत्तर दिले तर शिष्टमंडळांकडून वाट्टेल त्या भाषेत अपमान केला जातो. त्यामुळे संघाचे संकलन, विक्री व दैनंदिन काम करायचे की रोज एका शिष्टमंडळासाठी वेळ द्यायचा, असा प्रश्न प्रशासक मंडळासमोर पडला आहे. त्यामुळे प्रशासक मंडळातील सर्वच सदस्य अस्वस्थ आहेत. काल झालेल्या प्रशासक मंडळाच्या बैठकीतही यावर नाराजी व्यक्त केली.

नेत्यांनी आवर घालण्याची गरज

दरम्यान तक्रार देणारे संस्था प्रतिनिधी हे सत्तेतील नेत्यांच्या मर्जीतील आहेत. कधी महाडिक गटाच्या संस्था प्रतिनिधींकडून तक्रारी अर्ज दिल्या जातात तर कधी मंत्री मुश्रीफ गटाच्या संस्थाप्रतिनिधींकडून अर्ज दिला जातो. त्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये आता नेत्यांनीच लक्ष घालण्याची गरज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT