Gokul Milk Union Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul President Election : हातातोंडाचा घास महायुतीने पुन्हा हिरावला, गोकुळ संघाच्या अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटलांच्या पदरी पुन्हा निराशा

Gokul Milk Union President Election Latest News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून पेच निर्माण झालेला असतानाच महायुतीच्या संचालकांनी कोरम बैठकीला पाठ फिरली. यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात घमासान होण्याची चिन्हे आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News : निवडणुकीनंतर गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी सुरू असलेल्या घडामोडींमध्ये पुन्हा एकदा शशिकांत पाटील-चुयेकर यांना वंचित राहावे लागले आहे. कोरमअभावी सभा तहकूब झाल्याने चुयेकर यांची दुसऱ्यांदा संधी हुकली आहे. कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष करावा, या हट्टामुळे ही संधी हातातून गेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अध्यक्षपदाच्या आशेवर पाणी फिरले आहे. दरम्यान, आज गोकुळ शिरगाव येथे घेण्यात आलेली सभा देखील कोरमअभावी तहकूब करण्यात आली.

दूध संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत काही काळ वगळता चुयेकर कुटुंबीयांचा गोकुळमधील सहभाग केवळ संचालकपदापुरताच मर्यादित राहिला आहे. पूर्वी आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पत्नी जयश्री यांनी संचालकपदावर काम पाहिले. मात्र, अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्यानंतर आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी शशिकांत पाटील-चुयेकर यांना संधी देण्याचे ठरवले होते.

मागील सत्तेत सुरुवातीला गोकुळचे अध्यक्षपद दोन वर्षे सतेज पाटील गटाकडे आणि दोन वर्षे हसन मुश्रीफ यांच्याकडे राहिले. तर उर्वरित एक वर्ष सतेज पाटील यांच्याकडे देण्याचे ठरले होते. मात्र, राज्यातील सत्तांतराचा परिणाम गोकुळमध्ये झाला. अरुण डोंगळे यांनी राजीनामा न देण्याची भूमिका घेतली. संघावर महायुतीचाच अध्यक्ष असावा, असा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या आक्रमक रणनीतीपुढे डोंगळे यांनी नमते घेतले आणि राजीनामा देऊन मोकळे झाले. त्यानंतर सर्वसंमतीने शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आले. संस्थापकांच्या चिरंजीवालाच संधी मिळत असल्याने विरोध होण्याची शक्यता कमीच होती. तब्बल 35 वर्षांनंतर चुयेकर कुटुंबाकडे अध्यक्षपदाचा मान जाणार होता.

त्यामुळे त्यावेळी साहजिकच गावातही तयारी पूर्ण झाली होती. जंगी मिरवणूक काढून जल्लोष केला जाणार होता. दारात मांडव सजवला होता. गावजेवण ठेवण्यात आले आणि त्याचे आमंत्रणही सर्वांना देण्यात आले. मात्र, त्यावेळी महायुतीचाच अध्यक्ष हवा, असा हट्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

या हट्टामुळे शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव मागे पडले आणि नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. शशिकांत पाटील-चुयेकर अध्यक्ष होता होता थोडक्यात राहिले. मात्र, त्यावेळी अध्यक्ष होणार म्हणून चुयेकर यांच्या घरी भव्य मांडव घालण्यात आला होता. शिवाय, कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. मात्र, महायुतीच्या नेत्यांच्या हट्टामुळे चुयेकर यांना अध्यक्षपदापासून वंचित राहावे लागले.

आजही शशिकांत पाटील यांच्या घरासमोर शुकशुकाट

दरम्यान, समविचारी आघाडीकडून गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव पुढे केले गेले आहे. मात्र, महायुतीच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा चुयेकर यांना अध्यक्षपदापासून वंचित राहावे लागले आहे. महायुतीच्या घडामोडींचा अंदाज आल्यानंतर कालपासून चुयेकर यांच्या घरी कोणतीही तयारी करण्यात आली नाही. त्यांच्या घरासमोरही आज शुकशुकाट पाहायला मिळाला. मात्र, निवडणूक अधिकारी ज्यावेळी दुसऱ्यांदा सभा बोलावतील, त्यावेळी पुन्हा एकदा शशिकांत पाटील यांना संधी मिळू शकते.

'तो हार पुन्हा एकदा पुतळ्याजवळ'

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीत आज महायुतीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल, अशी आशा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह समविचारी आघाडीच्या संचालकांना होती. मात्र, महायुतीचे संचालक या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत. महायुतीकडून सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा धरून गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात असलेल्या गोकुळचे संस्थापक आनंदराव ज्ञानदेव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यासमोर पुष्पहार ठेवण्यात आला होता.

तो हारदेखील काही काळ बाजूला तसाच टांगून ठेवण्यात आला होता. दरवेळी अध्यक्ष निवड झाल्यानंतर तो हार त्यांच्या पुतळ्याला अर्पण केला जातो. मात्र, अध्यक्ष निवड न झाल्याने तो हार त्या ठिकाणी तसाच पडून राहिला होता. याची चर्चादेखील या ठिकाणी चांगलीच रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT