kolhapur Gokul Politics; satej Patil And Prakash Abitkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election : ‘सोबत घेऊन अध्यक्ष निवडणार असाल तर स्वागत’; महायुतीकडून सतेज पाटलांना पहिल्यांदाचा मैत्रीचा हात!

Prakash Abitkar challenges Satej Patil over Gokul chairman election गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या पेचावर महायुती सरकारने पाच शासननियुक्त संचालकांच्या निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता नवा वाद सुरू झाला असतानाच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Aslam Shanedivan

Kolhapur Gokul Politics News : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या पेचात आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे नेते आणि मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे नेते, आमदार सतेज पाटील यांच्याशी जुळवून घेण्याची तयारी दर्शवली आहे. ‘आम्हाला सोबत घेऊन अध्यक्ष निवडणार असाल आणि एकमेकांना सोबत घेऊन एका विचाराने काम करणार असाल, तर स्वागत आहे,’ असे म्हणत आबिटकर यांनी सतेज पाटील यांना मैत्रीचा हात दिला आहे. मात्र, त्याचवेळी बहुमत असेल तर सत्ता स्थापन करून दाखवा, असे आव्हानही त्यांनी दिले.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे १३, तर महायुतीचे १२ संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडे एका जागेचे बहुमत असले, तरी गोकुळच्या बायलॉजनुसार सभा घेण्यासाठी १४ संचालकांचा कोरम आवश्यक आहे. महाविकास आघाडीकडे १३ आणि महायुतीकडे १२ संचालक असल्याने अध्यक्ष निवडीची सभा घेण्याबाबत तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पाच शासननियुक्त तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याचे आबिटकर यांनी सांगितले.

‘रडीचा डाव येतोच कुठून?’

शासननियुक्त संचालकांच्या निर्णयावर विरोधकांकडून टीका होत असताना आबिटकर यांनी या निर्णयाचे समर्थन केले. ते म्हणाले, गोकुळमध्ये १३ संचालक महाविकास आघाडीचे आणि १२ संचालक महायुतीचे निवडून आले आहेत. मात्र, १४ जणांचा कोरम पूर्ण होत नसल्याने कोणालाही सभा घेता येत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत असूनही त्यांना सत्ता स्थापन करता येत नाही आणि महायुतीकडे १२ सदस्य असल्याने त्यांनाही सत्ता स्थापन करता येत नाही.

या तांत्रिक अडचणीवर मार्ग काढण्यासाठीच सरकारने मध्यस्थी केली. अन्यथा गोकुळवर प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली असती. प्रशासक येण्यापेक्षा पाच तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या संचालकांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहता येणार नाही. ते निवडून आलेल्या २५ संचालकांना योग्य पद्धतीने काम करण्यासाठी मदत करतील, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.

विरोधकांनी या निर्णयाला ‘रडीचा डाव’ म्हटल्याबाबत विचारले असता, ‘रडीचा डाव येतोच कुठून?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमच्याकडे १२ आणि त्यांच्याकडे १३ संचालक आहेत. बहुमत असल्याचा दावा करणाऱ्यांनी सत्ता स्थापन करून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी सतेज पाटील यांना दिले.

‘साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या हितासाठी एकत्र येऊ’

गोकुळच्या साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या हिताचा विचार करणे महत्त्वाचे आहे. या लोकांच्या हिताचा विचार करण्याचा मक्ता केवळ विरोधकांकडे नाही. आमच्याकडेही तज्ज्ञ आणि अनेक वर्षे गोकुळमध्ये काम केलेले अनुभवी लोक आहेत. दूध उत्पादकांचे आणि सहकाराचे हित जपणारे संचालक आमच्याकडेही आहेत, असे आबिटकर म्हणाले.

‘आम्हाला सोबत घेऊन अध्यक्ष निवडणार असाल आणि एकमेकांना सोबत घेऊन एका विचाराने काम करणार असाल, तर स्वागत आहे,’ असे म्हणत त्यांनी सतेज पाटील यांच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षात आता राजकीय विरोध बाजूला ठेवून एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आली आहे.

निर्णयाला विरोध झाल्यास प्रशासक किंवा फेरनिवडणुकीची शक्यता

सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध झाला, तर गोकुळवर प्रशासक नियुक्त करावा लागू शकतो किंवा पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागू शकते, अशी भीतीही आबिटकर यांनी व्यक्त केली. राज्यातील सहकारी संस्थांमध्ये अशा प्रकारचा तांत्रिक पेच निर्माण झाल्याचे उदाहरण नसल्याचे सांगत त्यांनी मंत्रिमंडळाचा निर्णय संयुक्तिक असल्याचे म्हटले.

गोकुळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने १३ जागा जिंकून आघाडी घेतली असली, तरी अध्यक्ष निवडीचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही. अशा परिस्थितीत महायुतीने सतेज पाटील यांच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता सतेज पाटील या मैत्रीच्या प्रस्तावाला काय उत्तर देतात आणि गोकुळच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही बाजू एकत्र येतात का, याकडे कोल्हापूरचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT