Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीच्या मतमोजणीत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. तिसऱ्या फेरीअखेर सर्वसाधारण गटात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या सहा उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे, महायुतीचे अनेक दिग्गज उमेदवार पिछाडीवर पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दुसऱ्या फेरीअखेर महायुतीच्या उमेदवारांना कडवी टक्कर देणाऱ्या सतेज पाटील यांच्या आघाडीने तिसऱ्या फेरीतही आपली कामगिरी कायम ठेवल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे, महायुतीचे नेते आमदार विनय कोरे यांच्या प्रभावक्षेत्रातही समविचारी आघाडीने मुसंडी मारल्याचं यापूर्वीच्या मतमोजणीतून समोर आलं होतं.
अरुण डोंगळेंसह सहा उमेदवारांना धक्का
गोकुळच्या मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअखेर महायुतीकडून निवडणूक लढवणारे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक अशोक चरटी, प्रताप पाटील-कावणेकर, एस. आर. पाटील, अमर पाटील आणि कर्णसिंह गायकवाड हे मातब्बर उमेदवार पिछाडीवर असल्याचं समोर आलं आहे. अनुभवी आणि प्रभावशाली उमेदवारांना पिछाडीचा सामना करावा लागत असल्याने महायुतीच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडीवर असलेल्या महायुतीच्या उमेदवारांची तिसऱ्या फेरीअखेर पीछेहाट झाल्याने निकालाच्या समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे.
सतेज पाटलांच्या सहा शिलेदारांची आघाडी
एकीकडे महायुतीचे दिग्गज पिछाडीवर असताना, दुसरीकडे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने सर्वसाधारण गटात जोरदार मुसंडी मारली आहे. आघाडीचे शशिकांत पाटील-चुयेकर, अभिजीत तायशेटे, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, विद्याधर गुरबे आणि राहुल देसाई हे सहा उमेदवार आघाडीवर असल्याचं वृत्त आहे. या सहा उमेदवारांनी आघाडी घेतल्याने समविचारी आघाडीच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र, अंतिम निकालासाठी अद्याप पुढील मतमोजणी महत्त्वाची ठरणार आहे.
क्रॉस व्होटिंगमुळे गोकुळच्या निकालाचं गणित बदललं?
गोकुळच्या निवडणुकीच्या सुरुवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी 40 ते 50 मतांच्या फरकाने आघाडी घेतली होती. मात्र, क्रॉस व्होटिंगची चर्चा आणि मोठ्या संख्येने बाद झालेली मते यामुळे निवडणुकीचं गणित बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या फेरीअखेर अरुण डोंगळे आणि अमर पाटील यांच्यासह महायुतीच्या अनेक उमेदवारांना पिछाडीचा सामना करावा लागत असल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल झाल्याचं चित्र दिसत आहे.
दरम्यान, मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांमध्ये कोण आघाडी कायम राखणार आणि कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. सध्या समविचारी आघाडीच्या सहा उमेदवारांची आघाडी चर्चेचा विषय ठरली असून, अंतिम निकालात कोणाचं पारडं जड ठरणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.