Gokul Dudh Sangh : Hasan Mushrif Vs Satej Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Politics : गोकुळच्या अध्यक्षपद निवडणुकीत सतेज पाटलांना सहकार्य करणार नाही : त्यांनी अध्यक्ष बनवून दाखवावा! हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज

Hasan Mushrif's Big Statement On Satej Patil And Shashikant Chuyekar As Gokul President : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भाजपसोबत वाद असल्यामुळेच पराभव झाला असे म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी पराभवाचे खापर भाजपवर फोडले आहे.

Rahul Gadkar

Nandurbar/Kolhapur News : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीवरून कोरमचा पेच निर्माण झाला असून, पुन्हा एकदा जिल्ह्यात महायुती विरुद्ध सतेज पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कोरमचा तांत्रिक मुद्दा पुढे करत महायुतीने वेगळाच डाव टाकल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू असतानाच मंत्री हसन मुश्रीफ यांचे सूचक विधान समोर आले आहे.

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करताना शशिकांत पाटील-चुयेकर यांना भविष्यात अध्यक्ष बनवण्याची जबाबदारी आमची असेल, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ते नंदुरबार येथे बोलत होते. यामुळे आता पुन्हा एकदा गोकुळवर सत्ता मिळवण्यासाठी महायुती रणनीती आखत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून पेच निर्माण झाला असून, महायुतीच्या संचालकांनी कोरमच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात घमासान होण्याची चिन्हे आहेत. यावरून आमदार सतेज पाटील यांनी, जिल्ह्यातील 5.5 लाख शेतकऱ्यांनी आम्हाला बहुमत दिले आहे. त्यामुळे कोरमचा मुद्दा उपस्थित न करता महायुतीच्या संचालकांनी सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन केले होते. मात्र, आता महायुतीत वेगळीच खिचडी शिजत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या निवडणुकीवर भाष्य केले आहे. त्यांनी गोकुळमधील पराभवाचे खापर भाजपवर फोडले असून, भाजपसोबतच्या वादामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पराभव झाल्याचे म्हटले आहे. निवडणुकीच्या वेळी भाजपसोबतचा वाद मिटला नाही, त्यामुळे 13 आणि 12 असा निकाल लागल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड होणार नाही, असे सूचित करताना सतेज पाटील यांच्याकडे 13 हा आकडा असला, तरी तो 14 होणार नाही, याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले. त्याचबरोबर, बंटी पाटील यांना एवढे मोठे बहुमत मिळाले असेल, तर त्यांनी अध्यक्ष निवडून दाखवावा, असे थेट आव्हानही मुश्रीफ यांनी दिले.

कोणत्याही परिस्थितीत सतेज पाटील यांना आम्ही सहकार्य करणार नाही, असे स्पष्ट करताना गोकुळची पुन्हा निवडणूक होणार नाही, असे आश्वासनही मुश्रीफ यांनी दिले. यावेळी त्यांनी नविद मुश्रीफ यांच्या पराभवाबद्दलची खंतही व्यक्त केली. या निवडणुकीत दुःख एवढेच आहे की, माझ्या मुलाचा पराभव झाला. एकच चूक झाली की, त्याने खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवायला हवी होती; मात्र त्याने आरक्षित जागेवरून निवडणूक लढवली, असे मुश्रीफ यांनी म्हटले. तसेच, गोकुळच्या निवडणुकीत मुलाला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी पुन्हा केला.

यावेळी मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांनी जातीयवादी प्रचार केल्याचा गंभीर आरोप केला. मतांची सरासरी पाहिली, तर सतेज पाटील यांच्या पॅनलपेक्षा आम्हाला अधिक मते मिळाली आहेत. मग विजय कोणाचा आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

गोकुळमध्ये विजय आमच्या बाजूने होता; मात्र 13 उमेदवार तांत्रिकदृष्ट्या निवडून आल्याचे सांगत मुश्रीफ यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवर भाष्य केले. सध्या अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत पाटील आहेत. बंटी पाटील त्यांना अध्यक्ष करणार होते; मात्र ते अद्याप झालेले नाही. गेल्या वेळी युतीच्या दबावामुळे माझ्या मुलाला अध्यक्ष करावे लागले, पण भविष्यात शशिकांत पाटील चुयेकर यांना अध्यक्ष बनवण्याची जबाबदारी आम्हालाच पार पाडावी लागणार असल्याचे सूचक विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मुश्रीफ यांच्या या विधानामुळे गोकुळच्या अध्यक्षपदावरून जिल्ह्याचे राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. आता यावर सतेज पाटील काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT