Kisan Yadav  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola Gram Panchyat Election : प्रचार करताना हृदयविकाराच्या धक्क्याने ग्रामपंचायत उमेदवाराचा मृत्यू; निवडणूक स्थगित

Vijaykumar Dudhale

Solapur News : आमदार शहाजी पाटील यांच्या चिकमहूद (ता. सांगोला) गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग पाचमधील विरोधी शिवसेना-शेतकरी कामगार पक्ष युतीच्या उमेदवाराचा प्रचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला, त्यामुळे या प्रभागातील अनुसूचित जाती प्रवर्गाची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू झाल्याने निवडणुकीचा रंगच बदलला आहे. (Gram panchayat candidate died of heart attack during campaigning in Sangola)

किसन सोपान यादव (वय ६९) असे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. ते शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधात असलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या युतीच्या पॅनेलमधून निवडणूक लढवत होते. प्रभाग पाचमधील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या ठिकाणाहून किसन यादव हे निवडणुकीच्या रिंगणात होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शुक्रवारी (ता. ३ नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता. त्यामुळे प्रचार शिगेला पोचला होता. सर्वच उमेदवार आणि पॅनेलप्रमुख आपापल्या पद्धतीने प्रचारासाठी फिरत होते. आमदार शहाजी पाटील यांच्या पॅनेलच्या विरोधात असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि शेकाप यांच्या तामजाईदेवी परिवर्तन ग्रामविकास आघाडीकडून किसन यादव हे तळेवाडी येथील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

चिकमहुद ग्रामपंचायतीच्या प्रभाग पाचमध्ये प्रचार करण्यासाठी किसन यादव हे लवकरच घराबाहेर पडले होते. प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना यादव यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना दरदरून घाम फुटला. त्याच अवस्थेत यादव हे घराकडे परत आले. घरी आल्यानंतर त्यांना ताबडतोब महूद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

प्रचारादरम्यान दगदग झाल्याने किसन यादव यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे ते लढवत असलेल्या प्रभाग पाचमधील अनुसूचित जाती प्रवर्गाची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत जाधव यांनी दिली. किसन यादव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT