Satara, 09 February : पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळवून दिली. मात्र, त्यांच्या कुटुंबातील दोघांना सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्यातून पराभावला सामोरे जावे लागले. ग्रामविकास मंत्री यांचे धाकटे बंधू अरुण गोरे यांना, तर भावजय भारती गोरे हे पराभूत झाले, तर शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे ह्या विजयी झाल्या आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या औंध गटात ग्रामविकास मंत्री गोरे यांचे थोरले बंधू अंकुश गोरे यांची पत्नी भारती गोरे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनीषा योगेश फडतरे यांनी आव्हान दिले होते. या निवडणुकीत फडतरे यांना एकूण ११३९४ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भारती गोरे यांना ११३४२ मते मिळाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत फडतरे यांनी अवघ्या ५२ मतांच्या फरकाने विजय मिळवत औंधचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे.
या निकालात भारती गोरे यांचा पराभव हा मंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे. सत्तेची ताकद, व्यापक प्रचार आणि मोठी यंत्रणा वापरूनही अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपमध्ये नाराजी दिसून येत आहे.
काही महिन्यांपूर्वी अंकुश गोरे यांनी औंध गटात वैयक्तिक लक्ष घालत जोरदार प्रचार केला होता. त्यांच्या पत्नी भारती गोरे यांना भाजपने उमेदवारी देत सत्ता परिवर्तनाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मतदारांनी हा प्रयत्न फेटाळून लावत राष्ट्रवादीवर पुन्हा विश्वास दाखवला आणि मनीषा फडतरे यांना विजयी केले.
औंध गटातून गोरे यांच्या भावजयबरोबरच कुकुडवाड गटातून अरुण गोरे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. जयकुमार गोरे यांचे भाऊ आणि भावजय पराभूत झाले असले तरी त्यांचे दुसरे बंधू शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे ह्या मात्र आंधळी गटातून विजयी झालेल्या आहेत.
औंध जिल्हा परिषद गट गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत गड म्हणून ओळखला जातो. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली हा गट राष्ट्रवादीने सातत्याने जनतेचा विश्वास जपत आला आहे, हे या निकालातून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
पंचायत समितीच्या निकालातही राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले आहे. औंध गणातून शुभम शिंदे आणि सिद्धेश्वर कुरोली गणातून मनोज देशमुख यांनी विजय मिळवला. तर भारतीय जनता पार्टीचे दादासाहेब इंगळे आणि शहाजी देशमुख यांना पराभव पत्करावा लागला.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रथमच एकहाती ३८ जागा जिंकून सत्ता प्रस्थापित केली आहे. मात्र, त्यांच्या घरच्या मैदानावर त्यांच्या कुटुंबातील दोघांना पराभव पत्कारावा लागल्याने गोरे समर्थकांकध्ये नाराजी दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.