Sharad Pawar-Bhagirath Bhalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur Politics : भगीरथ भालकेंना पवारांचा पंढरपूरसाठी ग्रीन सिग्नल; तुतारी फुंकण्याचे संकेत...

हुकूम मुलाणी

Mangalvedha, 07 July : पंढरपूर-मंगळवेढ्यातून विधानसभेसाठी इच्छूक असलेले भगीरथ भालके यांनी आज (ता. 07 जुलै) विठ्ठल परिवारातील नेत्यांसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत गोविंद बागेत जाऊन भेट घेतली. या वेळी पवारांनी पंढरपूरमधील राजकीय परिस्थितीचा आढावा घेताना विधानसभेला विरोधकांचा उमेदवार कोण राहील, आपल्यासोबत कोण राहील, अशी इत्यंभूत माहिती घेतली. त्या वेळी साहेब, तुम्ही पाठीअवर हात ठेवला तर चार मतदारसंघातून तुमच्या विचारांचे आमदार निवडून आणू, असा शब्द भालकेंसह विठ्ठल परिवारातील नेत्यांनी दिला.

दरम्यान, विठ्ठल परिवाराच्या (Vitthal Parivar) शिष्टमंडळाला आगामी विधानसभा निवडणुकीत संधी देण्याबाबत शरद पवारांनी (Sharad Pawar) सकारात्मकता दाखवल्याची माहिती असून भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) हे बीआरएसला सोडचिठ्ठी देऊन तुतारी फुंकण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पंढरपूर-मंगळवेढ्यातून भगीरथ भालके यांनी पाठिंबा दिला हेाता. महायुतीकडे आजी-माजी आमदार असतानाही शिंदे यांना पंढरपूर-मंगळेढ्यातून चाळीस हजारापेक्षा अधिकचे मताधिक्य मिळाले होते, त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने सध्या वेगवान हालचाली घडत आहेत. त्या अनुषंगाने विठ्ठल परिवारातील नेते आज शरद पवारांना जाऊन भेटले. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची माहिती या वेळी विठ्ठल परिवारातील नेत्यांनी शरद पवार यांना गोविंद बागेत जाऊन दिली.

यावेळी पवारांनीही ‘लोकसभा निवडणुकीत कुणी कुणी मदत केली?. मतदासंघात काय चित्र राहिले?, याबाबत माहिती घेत आगामी विधानसभेचे चित्र कसे राहील?, मतदारसंघात विरोधकांचा कोण उमेदवार राहील? लोकांचा कौल, मतदारसंघात कोणते प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. मतदार लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत आपल्या सोबत राहतील का? या गोष्टींचा कानोसा घेतला

विठ्ठल परिवाराच्या नेत्यांनी ‘साहेब आपण पाठीवर हात ठेवला, तर विठ्ठल परिवाराची चार विधानसभा मतदारसंघात (मोहोळ, माढा, पंढरपूर, सांगोला) ताकद आहे. आपल्या विचारांचे आमदार चार विधानसभा मतदारसंघात आम्ही निवडून आणू शकतो. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे आज जरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असले तरी ते विठ्ठल परिवारसोबत आहेत, असा विश्वास दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाल्याचे संकेत विठ्ठल परिवारातील नेत्याच्या भेटीमुळे मिळू लागले आहेत.

विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची साथ सोडल्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडे प्रबळ चेहरा नाही. महाविकास आघाडीला भगीरथ भालके यांच्या रूपाने प्रबळ उमेदवार मिळू शकतो, त्या दृष्टीने आज बारामतीत राजकीय घडामोडी घडल्याचे बोलले जात आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT