Solapur, 21 December : सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक नगरपालिका जिंकण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व प्रकारच्या अस्त्रांचा उपयोग करत तोडफोडीच्या राजकारणाला प्राधान्य दिले. अनेक ठिकाणी विरोधकांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पळवताना मित्रपक्षांना दुखवण्याचे कामही त्यांनी केले आहे. मात्र, पालकमंत्र्यांच्या एकाधिकारशाहीला आणि तोडफोडीच्या राजकारणाला सोलापूर जिल्ह्यातील जनतेने नगरपालिका निवडणुकीत पराभूत करत चपराक दिल्याचे मानले जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकरांपैकी केवळ तीन नगराध्यक्ष निवडून आणता आले आहेत, त्यात अक्कलकोट, मैंदर्गी आणि बार्शीचा समावेश आहे. यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा करिष्मा मोठा आहे. त्यामुळे या दोघांनी भाजपची काहीअंशी लाज राखल्याचे मानले जात आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पक्ष संघटनेला विश्वासात न घेता निर्णय घेण्याची एकाधिकारशाही, जुन्या भाजप कार्यकर्त्यांऐवजी आयात उमेदवार अन् उमेदवार निवडीत झालेल्या चुका भाजपला नडल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात पालकमंत्र्यांची कार्यशैली बदलणार की त्याच आक्रमक शैलीत काम करत राहणार, याची उत्सुकता आहे.
अनगर नगरपंचायत वगळता एकूण ११ नगरपालिका निकालांचा विचार केल्यास भाजप-शिवसेनेने तीन-तीन नगराध्यक्षपद जिंकले आहे. अक्कलकोट, बार्शी यापूर्वीच भाजपकडे होती. त्यात आता मैंदर्गी नगरपालिकेची भर पडली आहे. भाजपला मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, सांगोला या चार ठिकाणी विजय मिळणे अपेक्षित होते.
पंढरपूर, मंगळवेढ्यात समाधान आवताडे हे भाजपचे विद्यमान, तर प्रशांत परिचारक हे माजी आमदार आहेत. सांगोल्यात शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि मोहोळमध्ये राजन पाटील व करमाळ्यात श्यामल बागल हे माजी आमदार भाजपसोबत होते. मात्र, हे सर्वच नेतेमंडळी वातावरण भाजपला अनुकूल आहे आणि 'घाऊक इनकमिंग' मुळे तयार झालेल्या आभासी जगात वावरत राहिले. त्यामुळे भाजपला अनेक ठिकाणी अपेक्षित असूनही यश मिळू शकलेले नाही.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता आयात नेत्यांना उमेदवारी दिली, त्यामुळे भाजपचे जुने कार्यकर्ते दुखावले गेले. अनेकांना पक्षात येताचा उमेदवारीचा माळ गळ्यात घालण्यात आली. जुन्या निष्ठावंतांना संधी देण्याऐवजी नवे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले, तो प्रकारही भाजप कार्यकर्त्यांना रुचला नसल्याचे दिसून आले.
सांगोल्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना एकटं पाडणं भाजपच्या अंगलट आलं. त्याठिकाणी पाटील यांनी अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत वातावरण भावनिक बनविले आणि सांगोल्याच्या जनतेला शेकाप आणि भाजपची युती पटली नसल्याचे दिसून आले. पंढरपुरात खुली जागा असताना ओबीसी उमेदवार देणं प्रशांत परिचारक यांना महागात पडलं. इथली प्रणिता भालकेंची उमेदवारी परिचारकांसाठी डोईजड ठरली.
आमदार समाधान आवताडेंना अतिआत्मविश्वास नडला. राष्ट्रवादी नेत्यांच्या पत्नीला उमेदवारी देणे, हा डावही मंगळवेढ्यात फसला. या ठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष आणि आमदारांमध्ये रंगलेले नाराजीनाट्यही खासगीत चांगलेच चर्चिले गेले.
अकलूजमध्ये भाजपचा चंचूप्रवेश
भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपने चार जागा जिंकून अकलूजच्या मोहिते पाटील गडात चंचूप्रवेश केला आहे. भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह कुटुंबीयांना वगळून सातपुते यांनी एकहाती ही निवडणूक लढवली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या पूजा कोतमिरे यांचा २,६०२ मतांनी पराभव झाला असला तरी त्यांना एकूण मतदानापैकी ९,७१० मते मिळाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येथे सभा झाली असती तर ही लढत आणखी काट्याची होऊ शकली असती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.