Satej Patil
Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

प्रकाश आवाडेंनी भाजपला पाठिंबा देताच सतेज पाटील कल्लाप्पाण्णांच्या भेटीला!

सरकारनामा ब्यूरो

इचलकरंजी : कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी नेतेमंडळी आणि मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. इचलकरंजीच्या दौऱ्यावर आलेल्या सतेज पाटलांनी आज भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरी भेट दिली. ते मुंबईत असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. पण, ज्येष्ठ नेते, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे त्यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी इचलकरंजीतून आपल्याला ८० ते ८५ टक्के मतदान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Guardian Minister Satej Patil meet to former MP Kallappanna Awade)

विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला सतेज पाटील यांनी आज (ता. १३ नोव्हेंबर) इचलकरंजीतून सुरुवात केली आहे. शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी आपल्या दौऱ्यास सुरुवात केली. सतेज पाटील हे आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेणार होते. त्यांची वेळही घेतली होती. मात्र, आमदार आवाडे मुंबई दौऱ्यावर असल्याने भेट झाली नाही. मात्र, आवाडे यांच्या घरी जाऊन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा आशीर्वाद घेतला. दिवसभरात त्यांनी महाविकास आघाडीसह ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांचीही भेट घेतली. खासदार धैर्यशील माने, आमदार राजू आवळे त्यांच्यासमवेत होते. त्यानंतर यशोदीप भवनात पत्रकारांशी संवाद साधला.

या संपर्क मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. विधान परिषद निवडणुकीत इचलकरंजीतून ८० ते ८५ टक्के मतदान मिळेल. कारकिर्दीत अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे त्यांचे पाठबळ नक्कीच मिळणार आहे. कचरा आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. महापालिका करण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय केल्यास सोबत राहू, असे सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विरोधकांचे आव्हान गांभीर्याने घेत आहे, असे स्पष्ट करीत पाटील म्हणाले, ‘‘आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवीत आहोत. विरोधकांनी जरी आव्हान दिले असले तरी आमची व्यूहरचना यशस्वी करणार आहोत. त्यामुळे निकाल आघाडीच्या बाजूनेच लागणार आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडी एकसंध आहे. सगळीकडे चांगला पाठिंबा मिळत आहे. सध्या २५३ च्या पुढे आपल्या बाजूने मतदानाची आकडेवारी आहे. कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेवकांचे मतदान नसले तरी काय फरक पडणार नाही.’’ गुलाबराव घोरपडे, नगरसेवक शशांक बावचकर, राहुल खंजिरे, मदन कारंडे, संजय कांबळे, विठ्ठल चोपडे, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, महादेव गौड आदी उपस्थित होते.

नगरसेवकांशी संवाद... मान्यवरांच्या गाठीभेटी

पालकमंत्री पाटील यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे यांच्या निवासस्थानी, त्यानंतर संभाजी नाईक यांच्या निवासस्थानी ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांची चर्चा केली. माजी आमदार अशोकराव जांभळे यांची सायझिंगवर भेट घेतली. बालाजी पतसंस्थेच्या कार्यालयात शाहू आघाडीच्या नगरसेवकांशी संवाद साधला. शिवसेना शहर कार्यालय तसेच नगरसेवक रवींद्र माने यांच्या कार्यालयासही त्यांनी भेट दिली. नगरसेवक प्रकाश पाटील, आवाडे निवासस्थान आणी माजी खासदार जयवंतराव आवळे निवासस्थानी भेट देऊन दौरा पूर्ण केला.

आवाडे समर्थक भेटीपासून चार हात लांब

इचलकरंजी नगरपालिकेत काँग्रेसच्या चिन्हावर १८ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातील चार नगरसेवकांची आज पाटील यांच्याशी भेट झाली. काही जणांनी छुप्या पद्धतीने भेट घेतली. आवाडे समर्थक बहुतांशी नगरसेवकांनी भेट टाळली. हा गट त्यांची नंतर भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत मंत्री पाटील यांनी काही नगरसेवकांनी पडद्यामागे भेट घेतल्याचे सांगितले. तसेच, सर्व नगरसेवक पक्षासोबत राहतील, असा विश्वास व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT