Nana Patole
Nana Patole Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीकडून त्रास दिला जातोय : काँग्रेस नेत्यांची नाना पटोलेंकडे तक्रार

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : आम्ही भारतीय जनता पक्षाविरोधात लढताना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (ncp) त्रास दिला जातोय. त्यामुळे 'आई जेवू देईना अन्‌ बाप भीक मागू देईना' अशी आमची अवस्था झाली आहे, अशी खंत माजी गटनेते चेतन नरोटे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यापुढे मांडली. शिवाय माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांकडून कॉंग्रेस नगरसेवकांना निधी दिला जात नाही, अशी तक्रार केली. (Harassment by NCP : Complaint of Congress leaders to Nana Patole)

कॉंग्रेसच्या विजयी संकल्प मेळाव्याप्रसंगी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. त्यावेळी सर्वप्रथम चेतन नरोटे म्हणाले की, दररोज पाणी देतो; म्हणून सत्तेवर बसलेल्या भाजपच्या काळात सहा दिवसआड पाणी मिळत आहे. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात मंजूर झालेल्या कामांचे श्रेय भाजपचे नेतेमंडळी घेत आहेत. त्यानंतर बोलायला उठलेले बाबा मिस्त्री यांनी तर थेट पालकमंत्री दत्तात्रेय भरणेंवरच हल्लाबोल केला. ते म्हणाले, कॉंग्रेस हा खूप मोठा पक्ष असून कोणी गेल्याने तो संपणार नाही. पण, आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्री करण्याची गरज आहे.

जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील म्हणाले की, नाना पटोलेंच्या रुपाने कॉंग्रेसला उभारी देणारा सरसेनापती मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निश्‍चितपणे आगामी काळात कॉंग्रेसची यशस्वी वाटचाल सुरु राहील. दरम्यान, आमदार प्रणिती शिंदेंना मंत्रिपद मिळायलाच हवे. पण, नानाभाऊ तुम्ही ऊर्जामंत्री व्हायला हवे म्हणजे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होईल. त्यासाठी मी सोनियाजींना पत्र लिहणार आहे.

पक्षांतर्गत वादावादी, गटबाजीमुळे कॉंग्रेसची हानी झाली असून आपलेच लोक एकमेकांमध्ये साप सोडत आहेत. पण, ज्यांनी आपल्याला पद, प्रतिष्ठा, सन्मान मिळवून दिला, त्यांच्यासोबत कायमस्वरुपी राहायला हवे. कॉंग्रेसच्या वाढीसाठी प्रत्येकांनी तळागाळापासून काम करायला हवे. आता नुसते 'तुम आगे बढो' म्हणून चालणार नाही, असे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सुनावले.

बाबा मिस्त्री म्हणाले की, कॉंग्रेसने मला दक्षिण सोलापूरमधून आमदारकीची उमेदवारी दिली आणि 59 हजार मते मिळविली. कॉंग्रेसची ताकद मोठी आहे. पण, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी कॉंग्रेस नगरसेवकांना काहीच निधी दिला नाही. त्यामुळे कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद द्यायला हवे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी सोलापूर शहर-जिल्ह्यासाठी खूप काही काम केले. त्यांच्यानंतर राज्याच्या राजकारणात आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपदाची संधी द्यावी. राज्यातील सर्व महामंडळातील अध्यक्षांच्या निवडी तातडीने करून महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी केले.

योगी, महाराजांची जागा मंदीर-मठात : प्रणिती शिंदे

आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत निश्‍चितपणे कॉंग्रेसला मोठे यश येईल. महापालिकेवर कॉंग्रेसचाच झेंडा फडकणार आहे. सर्वसामान्य जनता हीच कॉंग्रेसची ताकद आहे. कॉंग्रेसच्या काळात गॅस सिलिंडरची किंमत साडेतीनशे रुपये होती, पण आता एक हजारांवर तो पोचला आहे. नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून पंतप्रधान नरेंद्र मोदी मते मागत आहेत. जाती-धर्मात भांडण लावून निवडणुका जिंकल्या जात आहेत. तरीही, दोनवेळा लोकसभेला पराभव झाला म्हणून खचून न जाताना पुन्हा जोमाने लढायला हवे. योगी आणि महाराजांची जागा मंदिर, मठात असून राजकारणात नाही. ते राजकारणात आल्यानेच देशाचे वाटोळे होत असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT