Hasan Mushrif BJP Suresh Khade  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : मुश्रीफांनी मिरजेत घेतलं भाजपला अंगावर? म्हणाले, 'भावी आमदार...'

Hasan Mushrif On Miraj's next MLA : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतक्या प्रतीक्षेनंतर होत असल्याने साहजिकच इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यातही महायुतीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी आतापासूनच काहींनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे.

सरकारनामा ब्युरो

Sangli News : शरद जाधव

तीन वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल अखेर वाजला आहे. पावसाचा जोर ओसरला की निवडणुकीचा ज्वर चढेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी महायुतीसह सर्व आघाड्यांनी आता मैदान तयार करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मिरजेतील राजकीय तापमान हे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) चे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी केलेल्या दाव्यामुळे तापलेलं आहे. मुश्रीफ यांनी मिरजेचा पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असल्याचे असा दावा केल्याने आता ‘पुढच्या आमदारा’चीच चर्चा समाजमाध्यमांवर रंगली आहे. ते मिरज दौऱ्यावर आले असता बोलून गेले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतक्या प्रतीक्षेनंतर होत असल्याने साहजिकच इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यातही महायुतीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी आतापासूनच काहींनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नुकताच मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (अजित पवार गट) कार्यकर्त्यांचा मेळावा व पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मंत्री हसन मुश्रीफ होते.

यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी झटून काम करण्याचा कानमंत्र दिलाच. पण त्यातही बोलताना पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच होणार असल्याची गुगलीही टाकली. लोकसभा, विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. मिरज मतदारसंघ आता राखीव राहणार नाही, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

त्यामुळेच पुढचा आमदार राष्ट्रवादीचा असल्याचा दाखला देऊन टाकला. इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पुढे, ‘जनतेतूनही संधी द्या,’ असे म्हणत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचा उमेदवारही सांगून टाकला.

विधानसभा निवडणुकीचा धुरळा आताच कुठे बसला असल्याचे चित्र आहे. आमदार सुरेश खाडे यांनीही याआधी, ‘मतदारसंघ राखीव असो अथवा खुला, मीच आमदार असेन,’ असे आत्मविश्‍वासाने सांगितले होते. विधानसभा निवडणुकीला बराच कालावधी आहे. ‘पुढचा आमदार’च्या चर्चेच्या कढीला नेतेमंडळी ऊत देत बसणार असल्याचेच यावरून दिसून आले.

समाजमाध्यमांवर चर्चा

मुश्रीफ यांच्या या घोषणेची समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली. आमदारकीला आणखी साडेचार वर्षे असल्याने गुडघ्याला बाशिंग नकोच, असा सल्ला कोणी दिला तर मतदारसंघ खुला होणार का, याबाबतही खुमासदार तर्क-वितर्क लढवले जात होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT