
Hasan Mushrif News : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित 40 कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात क्लीन चीट देण्यात आली आहे. मुरगूड पोलिसांनी या प्रकरणात कागल न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या रिपोर्टच्या आधारे मुश्रीफ यांची गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. दरम्यान, गुन्हा रद्द झाल्याने मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केला होती. यानंतर मुश्रीफ यांनी "गोरगरिबांचा आशीर्वाद, राजर्षी शाहू यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला आणि वारी सुरू असतानाच मला हा दिलासा मिळाला, असे म्हणत परमेश्वराचे आभार मानले.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 2 वर्षांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्यावर संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये 40 कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर झाली असल्याचे आरोप केले होते. या आरोपांनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मुश्रीफ यांच्यावर अटकेचीही टांगती तलवार होती. पुढे मुश्रीफ यांनी महायुतीत प्रवेश केला आणि शिंदे सरकार, फडणवीस सरकारमध्ये त्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री पद मिळाले.
सोमय्या यांच्या तक्रारीच्या आधारे मुरगूड पोलिस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल करून मुश्रीफ यांची चौकशी सुरु केली होती. त्यांच्या घरावर ईडीच्या धाडी पडल्या होत्या. त्यामुळे कोल्हापूरमधील राजकीय वातावरण कमालीचे तणावग्रस्त बनले होते. यादरम्यान, मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
उच्च न्यायालयाने 10 मार्च 2023 रोजी पुढील आदेशापर्यंत ते कायम ठेवले होते; तर ‘ईडी’ने दाखल केलेल्या गुन्ह्यातही हायकोर्टाने अंतरिम संरक्षण दिले होते. ते आजतागायत कायम होते. त्यानंतर आता तपासाअंती मुरगूड पोलिसांनी या प्रकरणात कागल न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या रिपोर्टच्या आधारे मुश्रीफ यांच्या वतीने उच्च न्यायालयात हा गुन्हा रद्द करावा, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती.
अतिरिक्त सरकारी वकील आशिष सातपुते यांनी याप्रकरणी पोलिसांनी कागल न्यायालयात सी-समरी (क्लोजर रिपोर्ट) अहवाल सादर केला असल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली. याची दखल घेत खंडपीठाने मुश्रीफ यांची याचिका निकाली काढली आहे.
क्लीन चीट मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "परमेश्वर महान आहे. असं म्हणतात की आंधळ्याच्या गाई परमेश्वर राखी, त्यामुळे माझ्या गायी सुद्धा परमेश्वर राखत असावा. गोरगरिबांचा आशीर्वाद, राजर्षी शाहू यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला आणि वारी सुरू असतानाच मला हा दिलासा मिळाला. मला बाकी काही बोलायचे नाही पण मी परमेश्वराचे आभार मानतो. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.