Hasan Mushrif
Hasan Mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

हसन मुश्रीफ म्हणाले, आमच्याकडे शीट, विखेंकडे बॅलन्स...

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी मागणीसाठी भाजपच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन केले होते. त्यावेळी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करत ते बॅलेन्स शीट चेक करत असल्याने त्यांना अहमदनगरमध्ये यायला वेळ नसल्याचे सांगितले होते. या टीकेला काल ( शनिवारी ) हसन मुश्रीफ यांनी प्रतिउत्तर दिले. Hasan Mushrif said, we only have the sheet, Vikhe has the balance ...

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आणि अतिवृष्टीच्या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री मुश्रीफ माध्यमांशी बोलत होते. या वेळी शिर्डी संस्थांचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले आणि अधिकारी उपस्थित होते.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी, पालकमंत्री बॅलन्सशीट तपासण्यात व्यग्र असल्याने ते नगरच्या पाहणी दौऱ्यावर येऊ शकले नाहीत, अशी टीका केली होती. त्यावर उत्तर देताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, की विखे मोठे आहेत. आमच्याकडे केवळ शीट आहेत. बॅलन्स मात्र त्यांच्याकडे आहे. पाच वर्षे विरोधी पक्षात राहिल्यानंतर ते आता भाजपमध्ये गेले. हर्षवर्धन पाटील यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनाही आता शांत झोप येत असेल, अशा शब्दांत त्यांना टोला लगावला.

कर्डिले यांनी आडवाटेने येऊन भेटावे

अकोले दौऱ्यावर असताना माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी मी सापडत नसल्याची टीका माझ्या वाचनात आली. वास्तवात मी अकोल्यात असताना, आडवाट करून मला येऊन भेटले असते, तर मी त्यांना सापडलो असतो. त्यावर पत्रकारांनी, त्यांना आडवाटेने विधान परिषदेची उमेदवारी देणार का, असा प्रश्न करताच मंत्री मुश्रीफ यांनी, असे होणार नाही. भाजपमधून राष्ट्रवादीत येऊन विधान परिषदेसाठी कोणी तिकीट मागत असेल, तर मला याबाबत कल्पना नाही, असा खुलासा त्यांनी केला. तसेच, माझ्यावर टीका करणारे आमदार बबनराव पाचपुते हे आमचे नेते असून, पूर्वी आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते. आता त्यांची तब्येत बरी नसून, त्यांनी आधी तब्येतीकडे लक्ष द्यावे, असा सल्ला पाचपुते यांना दिला.

पालकमंत्रिपदाचा संभ्रम पक्षश्रेष्ठीच दूर करतील

पालकमंत्री पदा संदर्भात मुश्रीफ म्हणाले, अहमदनगरप्रमाणे आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यात विधान परिषद, जिल्हा बॅंक, नगरपालिका, बाजार समित्या आणि त्यानंतर लगेच जिल्हा परिषद निवडणूक होत आहे. मी नगरचा पालकमंत्री आणि कोल्हापूरचा संपर्कमंत्री असल्याने, एकाच वेळी दोन ठिकाणी कसा वेळ देऊ शकणार? यात विनाकारण ओढाताण होणार असून, यामुळे पक्षाच्या बैठकीत नगरच्या पालकमंत्रिपदाच्या जबाबदारी सोडण्याबाबत मी पक्षश्रेष्ठींना बोललो आहे. याबाबत अंतिम निर्णय तेच घेतील, असा खुलासा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

मुश्रीफ पुढे म्हणाले, की लवकरच विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मी अध्यक्ष असणाऱ्या बॅंकेसह अन्य सहकारी संस्था, विधान परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत मंत्री या नात्याने वेळ देणे आवश्‍यक असून, एकाच वेळी दोन्ही जिल्ह्यांत वेळ देणे शक्‍य नाही. यात विनाकारण ओढाताण करण्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात माझा मतदारसंघ असल्याने, त्या ठिकाणी पूर्ण वेळ देण्याच्या दृष्टीने मी पक्षश्रेष्ठींकडे नगरच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. विधान परिषद निवडणुकीपूर्वी याबाबतचा संभ्रम दूर होईल. पत्रकारांच्या प्रतिप्रश्नावरदेखील, मी आता पालकमंत्री आहे, मात्र पुढील निर्णय श्रेष्ठी घेतील, असे स्पष्टीकरण दिले.

निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच होणार

विधान परिषदेची निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणूनच होणार असून, अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, ज्या ठिकाणी जमेल, त्या ठिकाणी महाविकास आघाडी, अन्यथा स्थानिक पातळीवर निर्णय होऊन लढती होतील, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी न केल्याने व्हॅटच्या स्वरूपात राज्य सरकारच्या तिजोरीतही पैसा पडत आहे. कोविडनंतर सर्व काही खुले केल्यानंतर आता बऱ्यापैकी महसूल सरकारकडे जमा होत आहे. लवकरच विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लवकरच निधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT