अतिवृष्टी आणि महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यात पिके, घरे व जनावरांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडले.
कोल्हापूरमधील मंत्री हसन मुश्रीफ यांनी ५१ लाख रुपये किमतीची अन्नधान्याची किट पाठवली; पहिल्या टप्प्यात ९०० किट वितरित झाल्या.
काँग्रेस नेते सतेज (बंटी) पाटील यांनी सहा टेम्पोभर जीवनावश्यक साहित्य पाठवून पूरग्रस्तांना दिलासा दिला.
Solapur, 03 October : अतिवृष्टी आणि महापुराने सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार उडाला होता. सोलापूर शहरासह जिल्ह्याला न भूतो अशा महापुराच्या संकटाला तोंड द्यावे लागले. अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतजमीन वाहून गेली, तर महापुरामुळे घरात पाणी शिरल्याने सर्वकाही वाहून गेले, त्यामुळे बळीराजा शब्दशः रस्त्यावर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूरमधील राजकीय दोस्त धावले असून त्यांनी तातडीने मदत पाठवली आहे.
सोलापुरातील पूरग्रस्तासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने अन्नधान्याचे किट पाठविण्यात आले आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांनी संसारोपयोगी साहित्याचे सहा टेम्पो भरून मदत पाठवली आहे.
सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सर्वत्र हाहाकार उडाला होता. महापुरामुळे अनेक ठिकाणी पशुधनही वाहून गेले आहे. वाचलेल्या पशुधनाला चारा काय टाकायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होता. जिल्हा प्रशासनाने शेजारच्या जिल्ह्यांतून चारा उपलब्ध करून तो पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही दिवस सोलापूरचे पालकमंत्री राहिलेले मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी अन्नधान्याचे कीट पाठवले आहे. मंत्री मुश्रीफ यांनी जवळपास 51 लाख रुपयांच्या अन्नधान्याच्या किट या दोन्ही जिल्ह्यांसाठी दिल्या आहेत पहिल्या टप्प्यात 900 अन्नधान्याच्या किट आलेल्या आहेत.
उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी ही किट पाठविण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या हस्ते रेल्वे लाईन येथील संपर्क कार्यालयात या किटचे वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पूरग्रस्तांसाठी सहा टेम्पो भरून मदत पाठवली आहे. यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, साखर, रवा, बिस्किटे, पाणी बॉटल आणि कपडे यांचा समावेश आहे. या जीवनावश्यक वस्तूंचे पूरग्रस्तांना नुकतेच वाटप करण्यात आले. याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी दिली
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.