कोल्हापूर : श्री राजाराम साखर कारखान्यावर केलेल्या आरोपाच्या संदर्भातील कागदपत्रे घेऊन मी आज (ता. १४ एप्रिल) संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात हजर आहे. तुम्हीदेखील डी. वाय. पाटील साखर कारखान्याची कागदपत्रं घेऊन बिंदू चौकात यावं. बंटी पाटील मी तुमची वाट बघतोय, असं खुलं आव्हान माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी माजी गृहराज्यमंत्री तथा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांना दिले आहे. (Amal Mahadik's open challenge to Satej Patil)
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील महादेवराव महाडिक यांच्या छत्रपती राजर्षी शाहू सहकारी आघाडी पॅनेलच्या प्रचार शुभारंभ आज करण्यात आला. त्यावेळी अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांना आव्हान दिलं आहे.
राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता रंगत येऊ लागली आहे. एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी उडत आहेत. आता अमल महाडिक यांच्या आव्हानाला सतेज पाटील काय उत्तर देतात, याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
अमल महाडिक म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत आम्ही मृत सभासदांच्या कुटुंबातील १०५२ जणांना सभासद केले आहे. ती यादी माझ्यासोबत आहे. तशी यादी त्यांनी डी. वाय. पाटील साखर कारखान्याची दाखवावी. गेली २२ वर्षे डी. वाय. पाटील कारखाना त्यांच्या ताब्यात आहे, त्यांनी एकतरी मृत सभासद ट्रान्स्फर केल्याचे दाखवावे. ते दाखवूच शकत नाहीत, कारण त्यांनी तसं केलंच नाही. सगळ्यात जास्त १३३ सभासद हे कसबा बावड्यातील ट्रान्स्फर झाले आहेत. त्यामुळे बंटी पाटील तुम्हाला कोणीतरी चुकीचे माहिती देत आहे. तुम्हाला तोंडघाशी पाडले जात आहे.
राजाराम साखर कारखान्याचे ३५ वर्षांचे अहवाल आहेत, बंटी पाटील तुम्ही डी. वाय. पाटील कारखान्याचे वीस वर्षांचे अहवाल दाखवा. नाही तर तुम्ही फक्त एक अहवाल दाखवला, तर मी पाच लाख रुपयांचे पैज लावतो. पण, बंटी पाटील तुम्ही ते दाखवू शकत नाही आणि दाखवू शकणारही नाही. आम्ही बोगस सभासद केले नाहीत, आम्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील केले आहेत. पण, मांडुकलीमधील ९२ जण तुमच्या कारखान्याचे सभासद झाले कसे, त्याचा खुलासा तुम्ही बंटी पाटील करायला पाहिजे, असे आव्हानही महाडिक यांनी बंटी पाटील यांना दिले.
महाडिक म्हणाले की, बंटी पाटील, भाषा तुमची ही मग्रुरीची, दादागिरी हा तुमचा स्वभाव आणि खोटारडेपणा हे तुमच्या राजकारणाचे सूत्र आहे. याचा खुलासा तुम्हाला राजाराम कारखान्याचे सभासद करायला लावतील. पहिल्यांदा तुम्हाला महादेवराव महाडिक यांनी आमदार केले, दुसऱ्यांदा मी थांबलो, त्यामुळे तुम्ही आमदार झालात, हे विसरू नये. मी कधीही गेलो तर एकटाच जातो, तुमच्यासारखं दहा-बारा गाड्या घेऊन फिरत नाही. माझ्या कारखान्याच्या सभासदांचे घर कुठे आहे, हे मला माहिती आहे. तुम्ही मात्र निवडणूक झाली की तिकडं फिरकतही नाही
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.