Sanajy Ghatge, Sanjay Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics News : मुश्रीफांना पाठिंबा देणे माजी आमदाराला भोवणार? ठाकरे गटाच्या उपनेत्याने दिले कारवाईचे संकेत

Rahul Gadkar

Kolhapur News : कागल विधानसभा मतदारसंघ माजी आमदार संजय घाटगे यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माजी आमदार संजय घाटगे हे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे नेते आहेत. तर मंत्री मुश्रीफ हे महायुतीचे कागल विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार आहेत.

मंत्री मुश्रीफांना पाठिंबा देण्याची घोषणा आता माजी आमदार संजय घाटगे (Sanjay Ghatge) यांना भोवणार असल्याचे दिसत आहे. त्याबाबत ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांच्या पाठीशी राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. घाटगे यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. त्यासंदर्भात घाटगे यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असेही संजय पवार यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत ही आरपारची लढाई आहे. त्यामुळे असा निर्णय घेतल्यास उद्धव ठाकरे कधीच माफ करू शकत नाहीत. लवकरच त्याबाबत निर्णय घेतील. पक्ष विरोधी कोणीही काम करू दे, मग तो आमदार असो वा खासदार असो, त्यांच्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे उद्धव ठाकरे हे कारवाईबाबत निर्णय घेतील, असेही शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत माजी आमदार संजय घाटगे हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यांनी उमेदवारीची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारीसाठी कोणतीही मागणी केलेली नाही.

कागल विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडे प्रबळ आणि भक्कम उमेदवार आहे. या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा कायम असणार आहे. मात्र, घाटगे यांनी त्यांचा निर्णय स्वतः घेतला आहे. त्यांनी याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबत कोणतीच चर्चा केलेली नाही, असेही संजय पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT