Hasan Mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : कोल्हापुरात सहकाराच्या नावावर सगळंच खपतंय; मुश्रीफांची महाआघाडीच्या नेत्यांशी मैत्री कायम!

Rahul Gadkar

Kolhapur News : महायुतीच्या मेळाव्यात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने केला. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणण्यासाठी एकदिलाने काम करण्याचा निर्णय माहितीच्या मेळाव्यात घेतला. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात सहकाराच्या नावावर सर्वकाही खपते, असे चित्र आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ महायुतीबाबतची भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करीत असले तरी अंतर्गत त्यांची भूमिका सहकाराकडून महाविकास आघाडीसोबत आहे की काय? अशा चर्चांना उधाण आले आहे. (Hasan Mushrif's friendship with leaders of Mahavikas Aghadi remains)

महायुतीच्या रविवारी झालेल्या मेळाव्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हजेरी लावली, तर सोमवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एका संस्थेच्या कार्यक्रमात स्तुतिसुमने उधळली. पालकमंत्री मुश्रीफ यांचे खंदे समर्थक माजी आमदार के. पी. पाटील यांनी बिद्रीची निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना ‘तुम्ही म्हणाल तसं’ असे विधान करून आगामी विधानसभेबाबतची पेरणी केली. दुसरीकडे मुश्रीफ यांच्याकडून ठाकरे गटाचे संजय घाटगे यांना गोंजारणे सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे अशी पार्श्वभूमी असताना सोमवारी (ता. १६ जानेवारी) गोकुळ दूध संघाच्या कार्यक्रमात खासदार संजय मंडलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती होती. एकीकडे महायुतीत राहायचं आणि दुसरीकडे सहकारात आमची मैत्री कायम राहील, असं सातत्याने मुश्रीफ सांगत आले आहेत. त्यामुळे सहकाराच्या नावाखाली कोल्हापुरात सगळंच खपतंय, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

ठाकरे गटाची सहकारातही रोखठोक भूमिका

मुश्रीफ यांची सहकारातील भूमिका वेगळी असताना बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत ठाकरे गटाने रोखठोक भूमिका घेतली असल्याचे सातत्याने पुढे आले आहे. बिद्री सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत आबिटकर यांच्या राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीला राधानगरी तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाचे भिकाजी गणपती हळदकर (तालुकाप्रमुख), के. के. राजगिरे, बाबूराव ज्ञानदेव बसरवाडकर (विभागप्रमुख) अशा प्रमुख कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. मात्र, त्यावर कारवाई करीत तडकाफडकी त्यांना पदावरून हटवून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

Edited By : Vijay Dudhale

R...

आश्चर्याची बाब म्हणजे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले आमदार सतेज पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हेही शेतकरी संघाच्या निवडणुकीत एकत्रित आले आहेत. एकमेकांना नेहमी शत्रू समजून राजकारणात चाल करणाऱ्या दोघांनाही एकत्र पोस्टरवर बघून कार्यकर्ते आवक झाले आहेत. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका किंवा विधानपरिषद निवडणुकीत हे दोघे एकमेकांच्या विरोधात उभे असतात. मात्र, सहकारात एकत्र येतात, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना काय असतील, हे समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला नसल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT