<div class="paragraphs"><p>Hasan Mushrif, Samarjit Singh Ghatge</p></div>

Hasan Mushrif, Samarjit Singh Ghatge

 

sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

हसन मुश्रीफ यांनी त्या लढतीसाठी तीन वर्षे तयारी केली... पण

निवास चौगले : सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये सध्या जिल्हा बॅंकेची (Kolhapur District Bank) रंणधुमाळी सुरु आहे. त्यामध्ये तुम्ही तुमच्या संस्था बघा, आम्ही आमच्या संस्था बघतो, आम्ही आडवे येत नाही, तुम्हीही येऊ नका, अशी समझोता एक्‍स्‍प्रेस कागल तालुक्याच्या राजकारणात धावली. त्याला निमित्त ठरली जिल्हा बँक आणि 'शाहू-कागल' साखर कारखान्याची निवडणूक. या निवडणुकीच्या निमित्ताने या तालुक्यातील संघर्षाला तात्पुरता का होईना ब्रेक मिळाला.

कागल तालुक्यात पक्षापेक्षा गटा-तटाला मोठे महत्त्व आहे. मुश्रीफ, राजे, मंडलिक आणि संजयबाबा असे चार प्रबळ गट तालुक्यात आहेत. राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या या तालुक्याने या गटांच्या माध्यमातून लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत पातळीवर संघर्ष आहे. अलीकडे मंडलिक-मुश्रीफ आणि संजयबाबा असे तीन गट एकत्र आहे, तर राजे गट स्वतंत्र आहे. मात्र, या चारही गटांचे स्वतंत्र अस्तित्‍व या ना त्यानिमित्ताने या तालुक्याने बघितले आहे.

राजे गटाचे प्रमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी थेट विधानसभेची तयारी केली. या मतदारसंघाचे पाचवेळी प्रतिनिधित्‍व केलेले ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनाच थेट आव्हान दिले आहे. २०१९ ची निवडणूक घाटगे यांनी लढवली. तेव्हापासून मुश्रीफ आणि राजे गटात ईर्षा पहायला मिळत आहे. हसन मुश्रीफ शाहू कारखान्याची निवडणूक आपल्या गटामार्फत लढवण्याच्या तयारीत होते. 'शाहू' हा मल्टिस्टेट कारखाना आहे, त्याची निवडणूक लढवायची असल्यास सलग तीन वार्षिक सर्वसाधारण सभेला हजेरी महत्त्वाची आहे. मुश्रीफ यांनी हा निकषही पूर्ण केला होता.

जिल्हा बँकेबरोबरच 'शाहू-कागल' चीही निवडणूक लागली. जिल्हा बँकेत मुश्रीफ यांना शह देण्यासाठी राजे गटाकडून कागल तालुका विकास संस्था गटात राजे गटाचे समर्थक बाबासाहेब हिंदूराव पाटील यांचा अर्ज दाखल केला होता. त्याच पद्धतीने शाहू कारखान्यात मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक नेताजी मोरे यांच्यासह अन्य तिघांचे अर्ज दाखल झाले होते. 'शाहू'च्या निवडणुकीतील अर्ज माघारीचा अखेरचा दिवस सोमवारी होता.

त्याचदिवशी या दोन नेत्यांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांत चर्चा झाली. त्यातून पहिल्यांदा पाटील यांनी बँकेच्या निवडणुकीतील अर्ज मागे घेतला अन् मुश्रीफ बिनविरोध झाले. काहीवेळातच 'शाहू'च्या रिंगणातून मुश्रीफ समर्थक मोरे यांच्यासह इतरांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे शाहूचीही निवडणूक बिनविरोध झाली. या नेत्यांच्या कार्यकर्त्यांत टोकाचा संघर्ष आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची झलक अनेकदा पहायला मिळत असते. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने या दोघांत धावलेल्या समझोता एक्सप्रेसमुळे कार्यकर्त्यांनी काय धडा घ्यायचा? हा प्रश्‍न आहे.

दोन्ही बाजूंकडून आभार

'शाहू'ची निवडणूक बिनविरोध होताच नूतन संचालकांनी विश्रामगृहावर येऊन मुश्रीफ यांचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी मुश्रीफ समर्थक भैया माने व अन्य कार्यकर्त्यांनी समरजितसिंह घाटगे यांचे अभिनंदन केले. त्याच बरोबर जिल्हा बँकेत केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. यातून या निवडणुकीपूरता तरी या दोन गटातील संघर्ष संपला असे म्हणायला हरकत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT