Dhairyasheel Mane sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhairyashil Mane News : भाजपच्या बांधणीचा फायदा शिवसेना खासदार मानेंच्या पथ्यावर पडणार!

Hatkanangale Loksabha Constituency : मागील लोकसभा निवडणुकीत इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातून सर्वाधिक मताधिक्य धैर्यशील माने यांना मिळाले होते. ते टिकविण्याचे आव्हान माने यांच्यासमोर आहे.

Rahul Gadkar

IchalKaranji Political News : मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा निवडणुकीचे मैदान मारले, त्यानंतर भाजपसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. भाजपचे माजी आमदार सुजित हळवणकर यांनी केलेली पक्षाची बांधणी, आमदार प्रकाश आवाडे यांचे मताधिक्य हेच महायुतीचे बलस्थान आहे. मागील लोकसभा निवडणुकीत इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातून सर्वाधिक मताधिक्य धैर्यशील माने यांना मिळाले होते. ते टिकविण्याचे आव्हान माने यांच्यासमोर आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बांधणीचा फायदा माने यांना मिळू शकतो. मात्र, महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार यावर अवलंबून आहे. जर हीं जागा भाजपला गेल्यास आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे, गोकुळ संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) हे देखील रिंगणात उतरण्याची चर्चा होती. तर राजू शेट्टी यांच्यासमोर इचलकरंजीतून जास्तीत जास्त मते घेण्याचे आव्हान असणार आहे.

शेट्टी यांचे नेतृत्व मानणारा शेतकरी वर्ग या मतदारसंघात खूपच कमी आहे, तर सर्वाधिक लक्ष हे अपक्ष आमदार असणारे प्रकाश आवाडे यांच्या भूमिकेकडे आहे. जर दुरंगी लढत झाल्यास आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी स्वाभिमानीला पाठिंबा दिल्यास राहुल आवाडे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता ना करता येत नाही. जातीय समीकरणातून मत विभाजन करण्याचा भाजपचा प्लॅन असू शकतो.

प्रामुख्याने शहरी चेहरा असलेला हा मतदारसंघ आहे. कबनूर, चंदूर, तारदाळ, खोतवाडी, कोरोची या पाच गावांसह इचलकरंजी शहराचा समावेश आहे. त्यामुळे मतदारसंघाचे भौगोलिक क्षेत्र खूप कमी असल्याने प्रचारासाठी सोपा आहे. या मतदारसंघात प्रकाश आवाडे यांचे सुरुवातीपासूनच वर्चस्व राहिले आहे, तर सुरेश हाळवणकर यांच्यामुळे भाजपनेही पाय घट्ट रोवले आहेत. अन्य राजकीय पक्षांची ताकद तुलनेने इतकी प्रभावी नाही. मात्र, इंडिया आघाडीची एकत्रित ताकद उपद्रवमूल्य निर्माण करू शकते.

गत निवडणुकीत माने यांच्या विजयात या मतदारसंघाचा मोठा हातभार लागला होता. भाजपची ताकद आणि सर्व पक्षांतील माने गटाला मानणारा वर्ग यामुळे सर्वाधिक मताधिक्य माने यांना मिळाले. ते मताधिक्य शेट्टी यांना तोडता आले नाही. आता मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे. गतवेळी पाणीप्रश्नाचा फटका शेट्टी यांना बसला होता. हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. हा मुद्दा या मतदारसंघात प्रचारात कळीचा मुद्दा ठरणार आहे.

यंत्रमाग उद्योगाला अखेरच्या टप्प्यात शासनाकडून अतिरिक्त वीज सवलतीसह विविध योजना जाहीर झाल्या आहेत. त्याचा फायदा धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांना होणार काय, हे पहावे लागणार आहे. आमदार आवाडे यांनी खासदार माने यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. त्यामुळे त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

घटक पक्षांची भूमिका महत्त्वाची...

राजू शेट्टी यांची या मतदारसंघात फारशी बांधणी नाही. त्यामुळे प्रचाराचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. इंडिया आघाडीची साथ मिळाल्यास शेट्टी यांना बळ मिळू शकते. पण, घटक पक्षांनी त्यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध केला आहे. त्यामुळे घटक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT