प्रमिला चोरगी
Solapur, 02 February : सोलापूर शहराच्या सुधारित विकास आखाड्याच्या प्रारूपात महापालिका प्रशासनाने अनेक चुका केल्या आहेत. सातारा शहरातील अनेक गोष्टी प्रशासनाने सोलापूर शहरात दाखवल्या आहेत. यात सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ला, खासदार उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान असलेले जलमंदिर (राजवाडा) सोलापूर शहरात असल्याचा दाखवण्याचा पराक्रम महापालिका प्रशासनाने केला आहे, त्यामुळे महापालिकेच्या आंधळ्या कारभारामुळे डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ सोलापूरकरांवर आली आहे.
सोलापूर (Solapur) शहराच्या सुधारित विकास आराखड्यात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलेल्या आहेत. अनेक ठिकाणच्या ४० वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारतींवर ठिकाणीही आरक्षणे टाकण्यात आली आहेत. कहर म्हणजे ज्या जागेवर रुग्णालय आहे, त्याही जागेवर महापालिकेने आरक्षण टाकले आहे. त्यामुळे सोलापूर शहराचा आराखडा प्रशासनाने डोळे बंद करून तयार केला आहे की काय, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
‘कापी पेस्ट’च्या नादात सोलापुरात नसणाऱ्या काही वास्तू शहरात दाखविण्याचा महापराक्रम महापालिका प्रशासानाने केला आहे. त्यात सातारा (Satara) शहरातील अजिंक्यतारा किल्ला, खासदार उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान असलेले जल मंदिर (राजवाडा,) चारभिंती, बदामी आदी ऐतिहासिक वास्तू शहरात असल्याचा उल्लेख या आराखड्यात दाखवण्यात आलेल्या आहेत.
महापालिका प्रशासनाच्या या आंधळ्या कारभारावर शहरातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडून प्रशासनाच्या या कारभावर कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत. सोलापूर भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी तर हा विकास आराखडा रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. आराखडा बनविणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि सोलापूर शहराचा हा विकास आराखडा तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सोलापूर शहराचा ४८० पानांचा सुधारित विकास आराखडा नुकताच जाहीर झाला आहे. महापालिक्त आयुक्त शीतल तेली उगले आणि उपसंचालक नगररचना मनीष भिष्णूरकर यांच्या सहीने तो महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्या आखाड्यातील २३९ क्रमांकाच्या पानावर सोलापूरमधील ऐतिहासिक स्थळांची माहिती देताना सोलापूर शहरात अजिंक्यतारा किल्ला, जल मंदिर (राजवाडा), चार भिंती, बदामी अशा ऐतिहासिक वास्तू असल्याचे दाखविले आहे. ही सर्व ऐतिहासिक स्थळे साताऱ्यातील आहेत. या प्रकारामुळे महापालिकेतील प्रशासकाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.
माहिती घेतो : नगररचना उपसंचालक
याबाबत नगररचना विभागाचे उपसंचालक मनिष भिष्णूरकर म्हणाले, सोलापूर शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात ऐतिहासिक वास्तूंच्या नावे चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध झाल्याचा विषय माझ्या कानावर आला आहे. नेमकं काय घडलं आहे, याबाबत सविस्तर माहिती घेण्यात येईल.
'आयुक्तांनी आराखडा पाहिलाच नाही'
सोलापूर शहराचा विकास आराखडा बनविण्यासाठी ठेका देण्यात आला हेाता. संबंधित ठेकेदाराने सुमारे ४८० पानांचा विकास आराखडा तयार केला आहे. हा आराखडा एक तर महापालिका आयुक्तांनी पाहिला नाही किंवा आयुक्तांना सोलापूर शहराची माहिती नसावी, हे यातून स्पष्ट होत आहे. प्रशासनाला शहाराच्या आगामी वीस वर्षांच्या आराखड्यासंंदर्भात किती गांभीर्य आहे, हेही दिसून येते. त्यामुळे या आराखड्याला आमचा विरोध आहे, असे कृती समितीचे कार्यकारी सदस्य शैलेश आमणगी यांनी स्पष्ट केले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.