
Mumbai, 02 February : मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीनंतरही म्हणजे २०२४ नंतरही मुख्यमंत्री तुम्हालाच करण्यात येईल, असा शब्द दिला होता, तो त्यांनी पाळला नाही. आपली फसवणूक झाली आहे, अशी शिंदेंची भावना आहे. अपमानित केल्याच्या दुःखातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडायला तयार नाहीत. त्यामुळेच दुःखाचा कडेलोट झाल्यानंतर ते आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे गावी जातात, असा खळबळजनक गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या रोखठोकमधून केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘सामना’तील रोखठोक सदरातून प्रचंड मोठे गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. प्रचंड मोठ्या बहुमताने महायुती सरकार सत्तेवर आले. मात्र, फडणवीस-शिंदे यांच्यातील विसंवादामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे, असा दावाही राऊतांनी केला आहे.
विधानसभेच्या निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखालील लढविण्यात येतील. तसेच, 2024 च्या निकालानंतरही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्हीच असाल. काहीही काळजी करू नका. निवडणुकीत खर्च करा, असा शब्द केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिला होता, त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड पैसा टाकला आहे. पण, मुख्यमंत्रिपदाचा दिलेला शब्द अमित शाहांनी पाळला नाही. आपली फसवणूक झाली आहे, अशी भावना शिंदे यांची झालेली आहे, असाही खुलास एका आमदाराने केला आहे, असे संजय राऊतांनी ‘रोखठोक’मध्ये नमूद केलं आहे.
संजय राऊत रोखठोकमध्ये म्हणतात की, पुन्हा मुख्यमंत्री केले नाही, या धक्यात एकनाथ शिंदे हे अजूनही झुलत आहेत. मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदे यांची धडपड सुरू आहे आणि फडणवीस हे सर्व ओळखून आहेत. गेल्या अडीच वर्षांत शिंदे-फडणवीस यांची तोंडे दोन दिशांना होती. फडणवीस आता त्याचे उट्टे काढत आहेत आणि आता शिंदे यांच्या हातात काहीच नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मन:स्वास्थ आता इतके बिघडले आहे की, ते आता आपल्याच आमदारांवर चिडचिड करतात, असेही त्यांच्याच एका प्रिय आमदाराने स्पष्ट केले आहे. याशिवाय शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांचा एक मोठा गट देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारी आहे. शिंदे गटातील कमीत कमी २१ आमदार हे फडणवीस यांचे नेतृत्व मान्य करतात, हे शिंदेंनाही माहिती आहे. उर्वरीत गट हा झालं गेलं विसरून पुन्हा स्वगृही जाण्यासाठी शिंदेंवर दबाव आणत आहेत, त्यामुळे शिंदेंची मोठी कोंडी झाली आहे.
अजित पवारांना शाहांच्या गुडबुकमध्ये राहायचे आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्थिती ही एकनाथ शिंदेंपेक्षा बरी आहे. कारण अजितदादांनी आपल्या मर्यादा जाणून पाऊले टाकली आहेत. त्यांचे फडणवीस यांच्याशीही चांगले नाते आहे. अजित पवारांना अमित शाह यांच्या गुडबुकमध्ये जायचे आहे. मुख्यमंत्री होण्यापेक्षा सुरक्षितपणे बाहेर राहिलेले बरे, हे धोरण अजित पवार यांनी स्वीकारलेले दिसत आहे, असा दावा संजय राऊत यांनी रोखठोकमधून केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.