Dilip Walse Patil, BullockCart Race  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बैलगाडा शर्यतप्रेमींना दिलीप वळसे पाटील यांनी दिली खूषखबर

सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षीच्या अखेरीस बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) बंदीविरोधात राज्यात अनेक आंदोलने करण्यात आली. अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे शर्यतीही भरवण्यात आल्या. अशांवर पोलिसांनी ठिकठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. आता हे सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केली आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या बैलगाडा शर्यतप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.

आंबेगाव तालुक्यातील थापलिंग यात्रेत माध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, बैलगाडा शर्यतबंदी विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर गुन्हे मागे घेतले जातील, असे वळसे पाटलांनी स्पष्ट केलं. आता ही प्रक्रिया कधी पूर्ण होणार, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, वळसे पाटील यांनी मागील वर्षीही गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली होती. मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्रमात गृहमंत्री वळसे पाटील बोलत होते. राज्यात बैलगाडा शर्यतींना बंदी असतानाही सांगलीसह काही भागांत बैलगाडा शर्यती झाल्या. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक ठिकाणी बंदीविरोधात आंदोलनेही करण्यात आली होती. या आंदोलकांवरही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मागील वर्षीच्या अखेरीस बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली आहे. केंद्रात काँग्रेसचे (Congress) सरकार असताना बैलाचा समावेश संरक्षित प्राण्यांच्या यादीत झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली. त्याविरोधात महाराष्ट्र सरकारने प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या 1960 च्या कायद्यात दुरुस्ती करीत 2017 ला अध्यादेश काढला. त्याकरिता नियमावली तयार केली. त्यामुळे या शर्यतीचा मार्ग पुन्हा मोकळा झाला होता. पण, त्यालाही प्राणीप्रेमी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने या शर्यतीवर पुन्हा बंदी आली. ही बंदी सर्वोच्च न्यायालयाने 16 डिसेंबरला तात्पुरती उठवली.

आता भरविल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतींसाठी 2017 ला बनवण्यात आलेली नियमावलीच पुन्हा लागू करण्यात आली आहे. त्यानुसार या शर्यतीतील बैलांना कसल्याच प्रकारची इजा वा त्रास होणार नाही, यासह 26 अटी टाकल्या आहेत. बंदी उठल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी शर्यतींचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT