Anant Lokhande and Anandrao Vaikar asking the Municipal Commissioner for answers in the Municipal Standing Committee
Anant Lokhande and Anandrao Vaikar asking the Municipal Commissioner for answers in the Municipal Standing Committee Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

होळी आधीच नगर महापालिकेत आयुक्त, उपायुक्तांच्या नावाने शिमगा

अमित आवारी

अहमदनगर - अहमदनगर महापालिका कामगारांच्या धरणे आंदोलनाचा आज ( शुक्रवारी ) 12 वा दिवस आहे. त्यांच्या प्रलंबित प्रश्नावर काल ( गुरुवारी ) आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) व महापालिका कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात विविध विभागाच्या अधिकारी व मंत्र्यांच्या गाठी भेटीचे सत्र सुरू केले मात्र अहमदनगर महापालिकेतील आयुक्त व उपायुक्त मुंबईत असूनही मंत्रालयात न आल्याने कामगार संघटना आक्रमक झाली. आक्रमक झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आज महापालिकेतील स्थायी समितीतील आर्थिक अंदाजपत्रकीय सभा बंद पाडत आयुक्तांनाच जाब विचारला. ( Holi is already Shimga in the name of Municipal Commissioner, Deputy Commissioner )

महापालिकेत आज सकाळी 11 वाजता अहमदनगर महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंदराव वायकर यांनी गेट सभा घेतली. यात दोन्ही नेत्यांनी काल ( गुरुवारी ) मंत्रालयात घडलेला सर्व प्रसंग सांगितला. तसेच महापालिकेतील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेचे कामकाज ठप्प झाले. महापालिकेत सकाळी 11.30 वाजता स्थायी समितीची आर्थिक अंदाजपत्रकीय सभा होती. त्यामुळे महापालिकेतील सर्व कर्मचारी घोषणा देत व आयुक्त, उपायुक्तांचा निषेध करत स्थायी समिती सभागृहात शिरले. त्यांनी सभागृहात ठिय्या मांडला. अहमदनगर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिका कामगार संघटनेने स्थायी समितीची सभा बंद पाडली.

सभेच्या वेळेत आयुक्त शंकर गोरे व महापालिकेतील अधिकारी स्थायी समितीच्या सभागृहात आले. मात्र स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे व सदस्य हे स्थायी समिती सभापतींच्या दालनात बसले होते. अनंत लोखंडे यांनी कुमार वाकळे व स्थायी समिती सदस्यांना सभागृहात येण्याची विनंती केली. तसेच काल घडलेला प्रसंग सांगितला. त्यामुळे कुमार वाकळेही आक्रमक झाले. त्यांनी स्वतः स्थायी समितीची सभा दोन तासासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेत महापालिका अधिकाऱ्यांवरच तोफ डागली.

कुमार वाकळे म्हणाले, माझे कुटुंबीय व मित्र कामगारांच्या संघटनांत आहेत. त्यामुळे कामगारांच्या समस्यांची मला जाण आहे. मागील 12 दिवसांपासून महापालिकेतील कर्मचारी आंदोलन करत आहेत. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मंत्रालयात का मांडली नाही. माझी स्थायी समितीवर निवड झाल्यावर माझी काल पहिलीच सभा होती. मात्र कोणत्याही अधिकाऱ्याने माझे स्वागतही केले नाही. महापालिका अधिकाऱ्यांना कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचे काही देणे घेणे नसल्याचे सांगत कालच्या घटने बाबत आयुक्त गोरे यांना जाब विचारला.

अनंत लोखंडे व आनंदराव वायकर यांनी सभागृहाला महापालिका अधिकारी कामगारांच्या प्रश्ना बाबत कसे उदासिन आहेत हे सांगितले. आयुक्त गोरे यांनी मी काल ( गुरुवारी ) मंत्रालयातील एका बैठकीत होतो. त्यामुळे संपर्क ठेऊ शकलो नाही. मात्र उपायुक्त यशवंत डांगे यांना आमदार संग्राम जगताप व कामगार संघटना पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले.

यावर अनंत लोखंडे यांनी उपायुक्त डांगे हे काल ( गुरुवार) पासून संपर्कात नाहीत असे सांगत असतानाच उपायुक्त डांगे यांचा लोखंडे यांना फोन आला. तो फोन लोखंडेंनी स्पिकरवर घेतला. लोखंडे म्हणाले डांगे साहेब महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात या आम्ही वाट पाहत आहोत. यावर उपायुक्त डांगे यांनी मी मुंबईत असल्याचे सांगितले. यावर लोखंडे व वायकरांनी सर्वांसमक्ष डांगेंना काल मंत्रालयात का भेटले नाही याचा जाब विचारला.

महापालिकेतील स्थिती पाहत स्थायी समितीचे सदस्य विनीत पाऊलबुधे, निखील वारे, गणेश कवडे यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली. आक्रमक महापालिका पदाधिकाऱ्यांना विनीत पाऊलबुधे यांनी सामंजस्याची भूमिका बजावण्याचे आवाहन केले. निखील वारे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या प्रश्नात महापालिका अधिकारी व संघटनेत मध्यस्थी म्हणून स्थायी समिती सभापती कुमार वाकळे यांनी भूमिका बजावण्याची विनंती केली. याला महापालिका कामगार संघटनेनेही दुजोरा दिला. मात्र महापालिका कामगारांचे प्रश्न सोमवारपर्यंत ( ता. 14 ) न सुटल्यास महापालिकेचे कामबंद करण्याचा इशारा आनंदराव वायकर यांनी दिला. त्यामुळे आजचे आंदोलन स्थगित झाले असले तरी महापालिका अधिकाऱ्यांना सोमवारपर्यंत काहीतरी ठोस तोडगा शोधावा लागणार आहे.

महापालिका कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत आंदोलन करण्याचा निर्णय काल सायंकाळी घेतला होता. त्यानुसार मुंबईत असलेले पदाधिकारी रात्रीच प्रवास करत पहाटे अहमदनगरला पोचले. आज दुपारी आंदोलन झाल्यानंतर हे पदाधिकारी पुन्हा मुंबईत नगरविकास मंत्र्यांच्या भेटीसाठी निघाले आहेत.

नागरिकांना वेठीस धरू नका

महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्ना बाबत संघटनेचे आंदोलन सुरू आहे. महापालिका अधिकाऱ्यांकडून काहीही ठोस उत्तर मिळत नाही. 12 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. सोमवारपासून आंदोलन अधिक आक्रमक होत आहे. महापालिका ही अहमदनगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सेवा देणारी संस्था आहे. नागरिक त्यासाठी कर देतात. महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांतील तनावामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले तर नागरिक कोणालाही माफ करणार नाहीत, असा इशारा माजी नगरसेवक निखील वारे यांनी महापालिका आयुक्त व अधिका-यांना दिला.

802 कोटीचे आर्थिक अंदाजपत्र

आंदोलनामुळे दोन तास स्थगित झालेली स्थायी समितीची सभा दुपारी दीड वाजता सुरू झाली. या सभेत महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी स्थायी समिती सभापती कुमार वाकळे यांच्याकडे महापालिकेचे 802 कोटीचे आर्थिक अंदाजपत्र सादर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT