Ram Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विधान परिषदेसाठी मी इच्छूक; पण निर्णय भाजपनं घ्यायचाय : राम शिंदे

भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने राज्यसभेसाठी नाव मागितली होती, त्यात माझंही नावं होतं. पण....

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधान परिषदेच्या (Legislative Council Election) उमेदवारी संदर्भात भारतीय जनता पक्षाचे (BJP) केंद्रीय आणि राज्य पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. अनेक इच्छुकांची नावं येत असतात, त्यापैकीच माझं एक नाव आहे. पण शेवटी निर्णय हा पक्षाने घ्यायचा आहे, असे विधान माजी आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी मुंबईत बोलताना केले. (I am aspiring for Legislative Council candidature: Ram Shinde)

मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राम शिंदे बोलत होते. त्यांना ‘राज्यसभेवर संधी मिळाली नाही. आता विधान परिषदेची तरी उमेदवारी मिळणार का,’ या प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी राम शिंदे यांनी वरील उत्तर दिले.

माजी आमदार शिंदे म्हणाले की, राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून तीन उमेदवारांनी आज अर्ज भरले आहेत. शेवटी पक्षाचा निर्णय महत्वाचा असतो. भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने राज्यसभेसाठी नाव मागितली होती, त्यात माझंही नावं होतं. पण भारतीय जनता पार्टीमध्ये एकदा निर्णय झाल्यावर तो मान्य करायचा असतो. मी भारतीय जनता पार्टीचा ३० वर्षांपासूनचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे जो निर्णय पक्षाने घेतला, त्या निर्णयाशी मी सहमत आहे. भाजपकडून तीन उमेदवारांचे अर्ज भरले आहेत आणि आशा आहे की हे तीनही उमेदवार निवडून येतील.

अहिल्यादेवी जयंती उत्सवाबाबत बोलताना राम शिंदे म्हणाले की, सत्तेचा माज आणि मस्तीच्या माध्यमातून आमदार रोहित पवारांनी दबावातून जयंती उत्सवाचे स्वरुप बदलेले आहे. मला राज्यभरातून फोन येत आहेत. मात्र, हे पवित्र स्थान आहे, अहिल्यादेवीचं जन्मस्थळ आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कोणतंही कृत्य होऊ नये, यासाठी आम्ही संयम बाळगला. सुमित्रा महाजन यांच्या कार्यक्रमातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्या ठिकाणीही आम्ही संयम बाळगला. याचा अर्थ तुम्ही काही करायचं, असं होत नाही. त्यामुळे अहिल्यादेवींची जयंती ही राष्ट्रवादीचा मेळावा न होता, ती सार्वजनिक जयंती उत्सव व्हावा, असं आमचं म्हणणं आहे.

कर्जत जामखेडमध्ये नदी खोलीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, रोहित पवारांच्या बगलबच्चांनी वाळू उत्खनन केले आहे. त्यांच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी. चौंडी ग्रामपंचायतीची ८० एकर जमीन रोहित पवार यांनी हडप केली आहे. अनेक गावच्या जमिनी हडप करण्याचे काम रोहित पवार आमदार झाल्यापासून सुरू आहे. सीना, घोड, कुकडीचे आवर्तन वेळेवर सुटलेले नाही, त्याकडे दुर्लक्ष करून जयंतीचा इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शिंदे यांनी रोहित पवारांवर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT