Pankaja Munde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pankaja Munde Shiv Shakti Parikrama : पंकजा मुंडेंच्या मनात चाललंय तरी काय?; ‘राज्याच्या राजकारणात सक्रिय नाही, पण ‘वेट ॲण्ड वॉच...’

Barshi News : कमिशन नाही. भजन नाही, भोजन नाही, पाठीमागे सरकारी लवाजमा नाही. आमदार, नामदार, खासदार नाही, ग्रामपंचायत सदस्यही नाही, तरीही तुम्ही मला एवढा पाठिंबा देता...

प्रशांत काळे

Barshi News : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा आज (ता. ९ सप्टेंबर) सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पोचली. भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी पंकजा यांचे जोरदार स्वागत करत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. बार्शीत पंकजा मुंडे यांनी पुन्हा सूचक विधान केले आहे. ‘राज्यात मी आता सक्रिय राजकारणात नाही. पण, ‘वेट ॲण्ड वॉच’ सगळं काही व्यवस्थित होईल’ असे विधान केल्यामुळे पंकजा मुंडेंच्या मनात चाललंय तरी काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. (I am no longer active in state politics; But 'Wait and Watch...' : Pankaja Munde)

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यात शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली आहे. ती आज सोलापूरच्या बार्शी तालुक्यात आली होती. बार्शीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९ सप्टेंबर) आमदार राजेंद्र राऊत, सभापती रणवीर राऊत यांच्याकडून पंकजा मुंडे यांचे पुष्पहार, फुलांची उधळण करून स्वागत केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी २०१४ मध्ये राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. जनतेचे अश्रू पुसावे, त्यांनी माझे अश्रू पुसावेत, असा त्यावेळी हेतू होता. आता कोणतेही मिशन नाही. कमिशन नाही. भजन नाही, भोजन नाही, पाठीमागे सरकारी लवाजमा नाही. आमदार, नामदार, खासदार नाही, ग्रामपंचायत सदस्यही नाही, तरीही तुम्ही मला एवढा पाठिंबा देता, त्यामुळे जनतेची शक्ती वाढविण्याचे काम करणार आहे.

पंकजाताई, तुम्ही आमच्याकडे या, अशी जनतेतून मागणी होती. पण पक्षाचे कोणते पद नाही, त्यामुळे मी का येऊ, अशी विचारणा कार्यकर्त्यांकडे केली. देवदर्शनासाठी निघावे, चहापाणी घ्यावे, विचारांची देवाण-घेवाण करावी, असे वाटले अन् दहा-बारा जणांना घेऊन शिवशक्ती परिक्रमा करायला निघाले. जनतेचा प्रतिसाद पाहून ही परिक्रमा नाही तर यात्राच झाली आहे, असेही पंकजा यांनी स्पष्ट केले.

मुंडे म्हणाल्या की, मध्य प्रदेशची सहप्रभारी म्हणून भाजपने माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. भक्तीची आवड आहे. अधिक मासात देवाचे दर्शन घेऊन सेवा केली. मनात कोणताही स्वार्थ, द्वेष, असूया, जळणे, राग रक्तातच नाही. लेकीला असाच आशीर्वाद देत राहा, एवढीच अपेक्षा आहे.

गोपीनाथ मुंडे मला भाजपमधून विधानसभेला उभा करणार होते. त्यांनी सातत्याने मला मदत केली. बार्शी तालुक्यात तुमच्यावर प्रेम करणारा वर्ग आहे. तुम्हीही लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी केली.

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, वालचंद मुंडे, श्रीराम मुंडे, रावसाहेब जाधवर, ईश्वर जाधवर, अरुण मुंडे, दिलीप गांधी, अॅड. सुभाष जाधवर, आबा ढाकणे, श्रीमंत घुले, बालाजी सांगळे, भीमराव दराडे, नामदेव वाघ, संतोष जाधवर, सचिन मडके तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT