Ajitrao Ghorpade
Ajitrao Ghorpade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक नाही

सरकारनामा ब्यूरो

शिरढोण (जि. सांगली) : सांगली जिल्हा बँकेतून सर्वसामान्यांना कर्ज मिळणे मुश्कील झाले आहे. अनेक कारणे सांगत आहेत. नेत्यांना मात्र तारण न देता कर्ज दिल्याची प्रकरणे आहेत. जिल्हा बँकेतील भ्रष्ट कारभार लवकरच उघड होईल, असा दावा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत केली. मी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक नाही, नगरपंचायत निवडणुकसाठी भूमिका लवकरच जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. (I am not interested in District Bank elections: Ajitrao Ghorpade)

जिल्हा बँकेची निवडणूक लागली आहे. तत्पूर्वी विद्यमान संचालक आमदार मानसिंगराव नाईक आणि इतरांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशीचे आदेश झाले होते. तर काहींनी चौकशीला स्थगिती मिळवली. यावरून संचालक मंडळात दुफळी निर्माण झाली आहे. निवडणुकीत राजकीय वातावरण तापणार असे चित्र असतानाच आज माजी मंत्री घोरपडे यांनीही तोफ डागली. नेत्यांना तारण न देता कर्ज दिल्याची प्रकरणे आहेत. लवकरच जिल्हा बँकेचा भ्रष्ट कारभार उघड होईल, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, ‘‘गेल्या दोन हंगामात कोरोनाच्या महामारीमुळे द्राक्ष विक्रीमध्ये मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. शेतकऱ्याला अतिशय कमी दरात माल विकावा लागला आहे. शेतकऱ्यांनी द्राक्ष शेतीमध्ये घातलेले पैसे देखील कमी दरामुळे निघाले नाहीत. शेतकरी कर्जबाजारी आहे. शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेले कर्ज परतफेड करणे मुश्कील आहे. त्यामुळे बँकांनी द्राक्ष शेती कर्जाचे तीन हप्ते करत कर्जाचे पुनर्गठन करावे. शेतकऱ्यांना यामध्ये सवलत द्यावी. त्यांना कर्जाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची व्याज सवलत निघून गेली आहे. व्याजासह दंड व्याज शेतकऱ्यांच्या डोक्यावर बसले आहे. बँकांनी द्राक्ष शेतीची कर्जाचे पुनर्गठन करावे. परतफेडीसाठी पुढील तीन वर्षांचे सुलभ हफ्ते ठरवून द्यावेत.’’

ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यात गरजेची आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून बांगलादेशात द्राक्षे जात होती. बांगलादेशाच्या सीमेवर प्रशासनाच्या गैरव्यवस्थेमुळे माल घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडवणूक होत आहे. हा त्रास लवकरात लवकर थांबावा, यासाठी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांची भेट घेणार आहे. खत कंपन्यांनी खत विक्रीसाठी तालुका डीलरशिप सहकारी संस्थांना द्यावी, अशी मागणीही करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.’’ युवा नेते राजवर्धन घोरपडे, नगराध्यक्ष पंडित दळवी, दिलीप झुरे, वैभव नरुटे, तुकाराम पाटील, विष्णू मिरजे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT