Subhash Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Subhash Deshmukh : मला विधानसभा लढवायची नव्हती; सुभाष देशमुखांनी सांगितला निवडणुकीपूर्वीचा घटनाक्रम

Assembly Election 2024 : दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सकाळी नाश्त्यासाठी त्यांच्याकडे गेलो, त्या वेळी ‘साहेब, खरंच माझी विधानसभा निवडणूक लढविण्याची मानसिकता होत नाही, त्यामुळे मला आता तिकिट नको’ अशी विनंती केली. त्यावर गडकरींनी ‘ठीक आहे, आता तू शांत राहा,’ असे खडसावले.

Vijaykumar Dudhale

Solapur, 14 December : विधानसभा निवडणूक लढविण्याची माझी मानसिकता नव्हती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निवडणूक समितीचे प्रमुख रावसाहेब दानवे आणि प्रभारी भूपेंद्र यादव या नेत्यांना भेटून मला विधानसभेची उमेदवारी नको, अशी विनंती केली होती. केवळ मलाच नव्हे; तर माझ्या परिवारातही उमेदवारीची माझी मागणी नव्हती. पण, पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिली. पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलो आणि सर्वांशी जुळवून घेत नियोजन केले. जनतेनेही माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवला, असे दक्षिण सोलापूरमधून निवडून आलेले सुभाष देशमुख यांनी सांगितले.

लोकमंगल समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामूहीक विवाह सोहळ्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या पत्र परिषदेत सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी निवडणुकीतील अंदर की बात सांगितली. ते म्हणाले, विधानसभा निवडणूक लढविण्याची माझी मानसिकता नाही, त्यामुळे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून कोणालाही उमेदवारी द्यावी. पक्षाच्या उमेदवारासाठी कार्यकर्ता म्हणून मी झटायला तयार आहे, अशी भूमिका मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे मांडली होती.

देशमुख म्हणाले, माझी भूमिका मांडल्यावर नितीन गडकरी (Nitin Gadkari) माझ्यावर थोडेसे रागावले. ‘असं कुठं असतंय का. तू मागू नको; पण उमेदवारी दिली तर नाही म्हणू नको,’ असा सल्ला त्यांनी दिला. त्यानंतरही मी त्यांच्याकडे मी लढतच नाही, असे सांगितले. पण त्यांनी तू लढलंच पाहिजे, असे सांगितले. त्या वेळी मी त्यांना हो म्हटलं. पण, दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सकाळी नाश्त्यासाठी त्यांच्याकडे गेलो, त्या वेळी ‘साहेब, खरंच माझी विधानसभा निवडणूक लढविण्याची मानसिकता होत नाही, त्यामुळे मला आता तिकिट नको’ अशी विनंती केली. त्यावर गडकरींनी ‘ठीक आहे, आता तू शांत राहा,’ असे खडसावले.

हीच गोष्ट मी देवेंद्र फडणवीसांच्या कानावर घातली. माझ्याविषयीच्या अनेक तक्रारी तुमच्याकडे आल्या आहेत. कोण तक्रारी घेऊन आलं आहे, याबाबत मला खुलासा करायचा नाही. पण, माझी एक विनंती आहे आपल्याला. मी या वेळी निवडणूक लढवत नाही. जो कोणी उमेदवार द्याल, त्याला निवडून आणण्यासाठी मी स्वतः उमेदवार आहे, असे समजून आटोकाट प्रयत्न करेन, असे फडणवीसांना सांगितले. पण, तेही ‘नाही नाही, असं होत नसतं. बघू आपण काय करायचं, त्या त्या वेळी,’ असेही फडणवीसांनी नमूद केले. ही सहा ते सात ऑक्टोबरची घटना आहे, असेही त्यांनी नमूद केले.

विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेब दानवे यांच्याकडे आम्ही गेलो होतो, त्या वेळी दानवेंनाही मी निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. निवडणूक लढवणार नाही, याबाबत बाईट तुम्ही देऊ नका. तुम्ही कोणाला म्हणू नका, असा सल्ला त्यांनी दिला. तरीही माझी मानसिकता तयार झाली नव्हती. त्यानंतर मी प्रभारीभूपेंद्र यादव यांना भेटलो, ते म्हणाले पार्टीचे कार्यकर्ते आहात तुम्ही, तुम्ही निर्णय घ्यायचा नाही. नेतृत्व जे सांगेल ते तुम्ही ऐकायचं. तुम्हाला घरी बस म्हटलं तर घरी बस ना. तुम्ही कोण ठरवणार घरी बसायचे की निवडणूक लढवायची की नाही लढवायची ते, असे त्यांनी मला सुनावले. त्यावर मी आजपर्यंत पक्षाने सांगितले आहे, तेच केले आहे, असे स्पष्ट केले.

देशमुख म्हणाले, विधान परिषद, २००४ च्या लोकसभेला, शरद पवार यांच्या विरोधात माढ्यातून लढण्यासाठी इच्छूक नव्हतो, तुळजापुरात शेवटच्या क्षणी मला जायला सांगितले. या सर्व निवडणुका पक्षाने सांगितल्या म्हणून लढलो. तसेच २०१४ मध्ये दक्षिण सोलापुरातून तिकिट दिलं. त्यानंतर २०१९ मध्ये शरद पवारांची माढ्यातून निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षाने मला तयारी करायला सांगितले होते. मी माढ्यात प्रचाराची एक फेरीही पूर्ण केली. पण पवारांनी माघार घेतल्याने माझी ती निवडणूक टळली.

माझ्यासाठीच नाही तर माझ्या परिवारातही उमेदवारीची माझी मागणी नाही. मी उमेदवारी नाकारतोय, म्हटल्यावर परिवारातील कोणाला उमेदवारी मागतो आहे की, असे वाटू नये; म्हणून त्यांच्याकडे खुलासा केला होता. मुलामध्ये गुणवत्ता असेल तर द्या अथवा देऊ नका. मी त्याला द्या, असेही म्हणणार नाही, असेही देशमुखांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT