Umesh Patil-Yashwant mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohol NCP : मोहोळ राष्ट्रवादी धुसतेय; 'माझ्यासाठी मतं माग, अशी विनंती उमेश पाटलांना करणार नाही'; यशवंत मानेंचा राग कायम

Vijaykumar Dudhale

Solapur, 31 August : आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्यासाठी काम कर, अशी विनंती मी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे प्रवक्ते उमेश पाटील यांना करणार नाही. त्यांच्यामुळे मला काही फरक पडणार नाही, अशा शब्दांत मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांनी आपल्याच पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर राग काढला.

आमदार यशवंत माने (Yashwant Mane) हे फुलचिंचोली येथे विविध विकास कामाच्या निमित्ताने आले होते. त्या वेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्यासाठी काम कर, अशी विनंती मी कधीही उमेश पाटील यांना करणार नाही, त्यांच्यामुळे मला काही फरक पडणार नाही.

एकवेळ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेतेमंडळींना ‘तुम्ही माझ्यासाठी सभा घ्या, प्रचार करा,’ अशी विनंती मी करेन. पण, उमेश पाटील (Umesh Patil) यांना मी सांगणार नाही की, माझ्यासाठी मतदान माग किंवा प्रचार कर. उमेश पाटील यांच्यामुळे मला काहीही फरक पडणार नाही, असेही आमदार माने यांनी म्हटले आहे.

मोहोळ मतदारसंघात कोणत्याही गटा तटाची अडचण असणार नाही. महायुतीचा धर्म चांगल्या प्रकारे पाळला जाईल. फक्त मोहोळ विधानसभा मतदारसंघापुरताच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचा धर्म पाळला जाईल, असा विश्वासही यशवंत माने यांनी बोलून दाखवला.

अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्यावरून आमदार यशवंत माने आणि उमेश पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. दोघांनी एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती.

आमदार माने हे अनगर अप्पर तहसीलच्या बाजूने ठामपणे उभे होते, तर उमेश पाटील यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयाला जोरदार विरोध केला होता, त्यामुळे मोहोळचे राजकारण अप्पर तहसील कार्यालयावरून चांगलेच पेटले होते.

मुळात आमदार माने हे माजी आमदार राजन पाटील यांच्याशी सख्य असणारे लोकप्रतिनिधी आहेत. राजन पाटील आणि उमेश पाटील यांचा छत्तीसचा आकडा आहे, त्यातूनच अनेकदा या देान्ही गटात एकाच पक्षात असूनही खटके उडतात, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उमेश पाटील यांची काय भूमिका असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT