MVA - Mahayuti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : इचलकरंजीत महायुतीत चुरस, मविआ तगड्या उमेदवाराच्या शोधात

Rahul Gadkar

Kolhapur News, 08 July : आगामी विधानसभा निवडणुकीवरून चांगलेच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. मात्र त्या ठिकाणी आयुक्त बदलण्यावरून महायुतीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली.

अशातच इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये (Mahyuti) आता उमेदवारीवरून चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. एकापेक्षा एक तगडे उमेदवार महायुतीकडे असल्याने एकत्र लढायचं झाल्यास उमेदवारी कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला तगड्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत नाराज असलेले विद्यमान आमदार प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मध्यस्थीनंतर सहकार्याची भूमिका घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आवाडे यांनी घेतलेली नाराजीची भूमिका ही पुढील निवडणुकीच्या अनुषंगाचाच एक भाग होता. तर भाजपकडून माजी आमदार सुरेश हळवणकर हे देखील इचलकरंजीतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

नुकतेच चार दिवसांपूर्वी शिंदे गटाचा जयसिंगपूर येथे मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांना देखील विधानसभा निवडणूक इचलकरंजीतून लढवावी असे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून लढण्यास सध्या तरी तीन मातब्बर आणि तगडे उमेदवार आहेत.

दरम्यान, आमदार आवाडे यांना या विधानसभा निवडणुकीत रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या (MVA) काही नेत्यांची बैठक झाल्याची माहिती आहे. आवाडे यांच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. महाविकास आघाडीकडून मदन कारंडे, राहुल खंजिरे हे निवडणुकीत लढवण्यास तयार आहेत. मात्र अपेक्षित असे यश महाविकास आघाडीला मिळेल असे नाही.

मात्र, महायुतीमध्ये उमेदवारी कोणाला द्यावी याचीच डोकेदुखी अधिक असणार आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्वतंत्र उमेदवारीची घोषणा होऊ शकते. शिवाय वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आल्यास या ठिकाणी महाविकास आघाडीलाच (MVA) फटका बसण्याची जास्त शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT