Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा देत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांना धोबीपछाड देण्यास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुरुवात केली आहे.
दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आमदाराच्या मदतीने आपल्या खासदाराची वर्णी कार्ला येथील एकविरा देवी ट्रस्टवर लावण्यात यशस्वी झालेल्या शरद पवारांनी आता अजित पवारांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये आपला दबदबा कायम ठेवण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने केले आहे.
यासाठी पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची 20 जुलैला मोठी सभा पिंपरी चिंचवड मध्ये होणार आहे. यावेळी शक्ती प्रदर्शन केले जाणार असून या सभेसाठी 20 हजाराहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी या सभेची माहिती दिली. पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारे जुने आणि नवीन कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मोट बांधण्यासाठी स्वतः पवार साहेब पिंपरी-चिंचवड शहरात येत आहेत.
त्यांची जाहीर सभा होणार असून यावेळी शक्तीप्रदर्शन देखील केले जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शरदचंद्र पवार गटाची ताकद दाखवण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी-चिंचवडचे नाव घेतले जाते. अजितदादांनी स्वतः या शहराकडे लक्ष दिल्याने पिंपरी-चिंचवडचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे बोलले जाते.
गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस मधून महत्त्वाच्या नेत्यांना घेऊन राज्याच्या सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांना नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल लक्षात घेता निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या मागे उभे असलेले अनेक माजी आमदार नगरसेवक, पदाधिकारी आता शरद पवार यांच्याकडे जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या आठवड्यात अजित पवार गटातील अनेक माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेत आपली भूमिका मांडली आहे. यामध्ये अजित पवार गटाचे विद्यमान शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
आगामी विधानसभा निवडणूक तसेच महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाची ताकद अधिक वाढावी यासाठी आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याचीच एक सुरुवात म्हणून शरद पवार साहेबांची ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेमध्ये अजित दादांना मानणारे अनेक मागील नगरसेवक पदाधिकारी पवार साहेबांच्या बाजूने उभे असतील, असा दावा शरद पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
90 टक्के माजी नगरसेवक हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. हा दावा यशस्वी ठरल्यास अजित पवार यांची पिंपरी-चिंचवडमध्ये डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.