Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्या बंडानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खंबीरपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहिले. एकीकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरून कायदेशीर लढाई सुरू असतानाच जयंत पाटील हे पवारांच्या बाजूने मजबूत किल्ला लढवत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यांनी राष्ट्रवादीच्या दोन गटांतील दावे- प्रतिदावे, कायदेशीर लढाईसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदावरही सूचक विधान केलं. अजित पवार(Ajit Pawar) गटाकडे गेल्यास जयंत पाटलांना मुख्यमंत्री करण्यात येणार असल्याच्या चर्चेवर त्या म्हणाल्या, वाह… वाह… चांगली गोष्ट आहे. अजित पवार गटाकडून जयंत पाटील मुख्यमंत्री झाल्यास मला आनंदच होईल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
सुळे म्हणाल्या, हे खोके, ट्रिपल इंजिन सरकार खुनी आहे. नांदेडमधील रुग्णांचा या सरकारने खून केला आहे. हे पैसे जे सरकार पाडण्यासाठी आणि आमदार विकत घेण्यासाठी तुम्ही वापरता. ते सोलापूरच्या पाण्यासाठी द्या. आमचे आशीर्वाद तरी तुम्हाला मिळतील, पण ‘बहोत हो गई पाणी की कपात, इस बार इंडिया सरकार' अशी नवी टॅगलाइन सुप्रिया सुळे यांनी सोलापुरातून दिली.
फडणवीसांच्या दिलदारपणाचे आणि त्यागाचे कौतुक...
भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय करतंय. मला त्याच्या वेदना होतात. फक्त फडणवीसांचा अपमान होत नाही, तर काँग्रेसच्या विरोधात ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी सतरंज्या उचलल्या, काठ्या खाल्ल्या आणि त्यांच्या कष्टाने १०५ आमदार निवडून आले. त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही, पण फडणवीसांनी काँग्रेस विचारांचा (अजित पवार) मुख्यमंत्री व्हावा, याचा जो आग्रह दाखवला आहे, त्या दिलदारपणाचे आणि त्यागाचे मी स्वागत करते असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी लगावला.
सुळेंच्या विधानावर जयंत पाटील काय म्हणाले..?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी खासदार सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्र्यांची गर्दी फार वाढायला लागली आहे. इकडून तिकडे गेल्यावर मुख्यमंत्री… तिकडून इकडे आल्यावर मुख्यमंत्री… इकडे दोन-तीन मुख्यमंत्री… तिकडे दोन-तीन मुख्यमंत्री… आणि रांगेत आणखी बरेच मुख्यमंत्री… त्यामुळे हे सगळं प्रकरण जनतेला मनोरंजनाचं वाटत असेल, असा खोचक टोलाही पाटील यांनी लगावला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.