Babanrao Shinde-Dhanraj Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhanraj Shinde : बबनदादांच्या पुतण्याचे प्रथमच राजकीय भाष्य; ‘रणजित शिंदेंची उमेदवारी बदलली तर ती माढ्याची फसवणूक ठरेल’

Vijaykumar Dudhale

Solapur, 27 September : बबनदादांनी राजकीय संन्यास घेतलाय. पुढचे उमेदवार रणजित शिंदेच असतील असे सध्याचे चित्र आहे. पण, भविष्यात त्यांनी उमेदवार बदलला तर ती माझी, कार्यकर्त्यांची आणि तालुक्यातील जनतेची फसवणूक असणार आहे. मला तुतारीचे तिकिट मिळाल्यानंतर विरोधात कोणीही असलं तरी निवडणूक लढवावी लागणार आहे, असे सांगून विधानसभेच्या रिंगणात समोर कोणीही असले तरी निवडणूक लढविण्यावर आपण ठाम असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी स्पष्ट केले.

आमदार बबनदादांचे चिरंजीव रणजित शिंदे (Ranjit Shinde) यांनी केलेले कार्य संपूर्ण माढा (Madha) तालुक्याला माहिती आहे. त्यामुळे मी पुढं आलं पाहिजे, अशी समाजाची अपेक्षा आहे. मी गेली दोन महिन्यांपासून माढा तालुक्यातील गावोगावी फिरत आहे, त्यामुळे तालुक्यातील जनतेची इच्छा आहे की आता मी पुढं आलं पाहिजे, असे धनराज शिंदे यांनी स्पष्ट केले.

धनराज शिंदे (Dhanraj Shinde) म्हणाले, शिवसेना आणि मनसे फुटली, अजित पवार आणि शरद पवार वेगळे झाले, तेव्हाही ते आतून एकच आहेत, अशी चर्चा होती. मी आणि बबनदादा शिंदे एकत्र आहोत, या वावड्या आहेत. त्या कोठेही तथ्य नाही. मला तुतारीची उमेदवारी मिळाली तर मला विचारण्यात येणार की पुढे बबनदादा असतील तर काय, तेव्हा मला उत्तर द्यावं लागणार आहे.

ते म्हणाले, सध्या रणजित शिंदे हेच उमेदवार आहेत, असं दिसतंय. मात्र त्यांनी भविष्यात उमेदवार बदलला तर ती माझी, कार्यकर्त्यांची आणि तालुक्यातील जनतेची फसवणूक असणार आहे. मला तुतारीचे तिकिट मिळाल्यानंतर विरोधात कोणीही असलं तरी निवडणूक लढवावी लागणार आहे. मला जरी उमेदवारी मिळाली नाही, तर तुतारीच्या उमेदवारासोबत आम्ही असणार आहोत. शरद पवारांच्या उमेदवारांचाच आम्ही प्रचार करू, असा शब्दही त्यांनी दिला.

घरात बंडखोरी मी सगळ्यात शेवटी केली आहे. अगोदर तालुक्याने बंडखोरी केली आहे. तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे, त्यामुळे बबनदादांच्या विरोधात लोकसभेला एवढे मतदान गेले आहे. विरोधात गेलेले सर्वजण आमचेच आहेत. जनता त्रस्त झाली आहे, त्यामुळे तालुक्यात बदल करण्यासाठीच आम्ही घरातून बाहेर पडलो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोहिते पाटील-शिंदे संबंध

विजयदादा आणि प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी आम्हाला सातत्याने राजकीय मदत केली आहे. मात्र काही गोष्ट नीट व्हायला पाहिजे होत्या, त्या झाल्या नव्हत्या. आमच्यात फारशा आलबेल गोष्टी नव्हत्या, असे सांगून मोहिते पाटील आणि शिंदे परिवारातील संबंधावर धनराज यांनी भाष्य केले.

पुत्रप्रेम

पुत्रप्रेमामुळेच लोकसभा निवडणुकीत बबनदादांच्या विरोधात मतदान गेले आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी, असं त्यांना वाटत आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, हेही त्यांना आता दिसत आहे, त्यामुळे ते शरद पवार यांना भेटत आहेत, असेही धनराज शिंदे यांनी सांगितले.

कारखानदार आमदार नको

ते म्हणाले, कारखानदार माणूस आम्हाला आमदार म्हणून नको आहे. व्यापारी माणसं आमच्यावर राज्य करणारी नसावीत. मुळात कारखानदार हे व्यापरीच आहेत. उस कमी असल्याने त्यांनी ३५०० ते ३६०० रुपये भाव जाहीर केला आहे. त्यांनी काय उपकार केले नाहीत.

सभापतिपदावेळी डावललं

राष्ट्रवादीच्या तिकिटावर मी पंचायत समितीच्या तिकिटावर निवडून आलेला आहे, त्यामुळे पक्षात सर्वांत जुना मीच आहे. सभापतीपद मला मिळावं, अशी समाजाची भावना होती. मात्र मला डावण्यात आलं. तिकिटातही डावललं होतं. मात्र युवकांनी बंड करून मला तिकिट मिळवून दिलं. पण, सध्या घरातून बाहेर पडून मी मोकळा श्वास घेतोय. मी माझे विचार मांडतोय, असेही शिंदे यांनी सांगितले.

अपक्ष लढायचं नाही

शरद पवार गटाकडून इच्छूक भरपूर आहेत. त्या इच्छुकांची अपक्ष उभा राहायचं नाही, ही मानसिकता नाही. आम्हाला सर्वांना शरद पवार यांचे काम करायचं आहे. आम्हाला कारखानदार आमदार नको आहे. मी कारखानदाराच्या विरोधात नाही, तर कारखानदारांच्या दबावाच्या राजकारणाच्या विरोधात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT